Abhimanyu Pawar News : दिवाळीपूर्वी 1200 कुटुंबांना सव्वा कोटींची मदत : आमदार अभिमन्यू पवार
विचार माणुसकीचा, एक हात मदतीचा’ या भावनेतून साकारलेला ‘औसा पॅटर्न’ आज समाजसेवेच्या आघाडीवर
लातूर : लातूर औसा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामस्थांवर मोठे संकट ओढावले असताना, दिवाळीच्या उंबरठ्यावर त्यांच्या आशेचा एक नवा दीप उजळून निघाला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने क्रीएटीव्ह फाउंडेशन व अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून १२०० कुटुंबांना अंदाजे सव्वा कोटी रुपयांची थेट मदत जाहीर करण्यात आली आहे.
ही मदत १५ ऑक्टोबर रोजी ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर व कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या शुभहस्ते धनादेश आणि अन्नधान्याच्या पॅकेट्सच्या रूपात वितरित केली जाणार आहे. ही केवळ आर्थिक मदत नाही, तर अंधारात आशेचा दीप पेटवणारा माणुसकीचा खरा अर्थ उलगडणारा उपक्रम आहे.
‘विचार माणुसकीचा, एक हात मदतीचा’ या भावनेतून साकारलेला ‘औसा पॅटर्न’ आज समाजसेवेच्या आघाडीवर एक आदर्श ठरत आहे. अतिवृष्टीमुळे औसा तालुक्यात अनेक गावांमध्ये पिकांचे, जनावरांचे आणि घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी मानवी जीवितहानीही झाली.
या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दत्ता भरणे आणि पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा दिला. या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारकडून तब्बल ३१,००० कोटी रुपयांची ऐतिहासिक नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली.
या शासकीय मदतीबरोबरच खाजगी संस्थांच्या माध्यमातून स्वतंत्रपणे अंदाजे सव्वा कोटी रुपयांची मदत उभी करून पवार यांनी समाजसेवेची नवी उंची गाठली आहे. या मदतीच्या वितरणाच्या पार्श्वभूमीवर औसाच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी औसा पॅटर्न, मदतीचा कार्यभाग व विकासाचा लेखाजोखा मांडला.
त्यांनी सांगितले की, ही मदत म्हणजे केवळ पैसे नाही, तर संकटातून उभं राहण्यासाठीचा आत्मविश्वास आहे. शेतकऱ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, शासकीय नुकसानभरपाई कोणतीही बँक थकबाकीच्या नावाखाली कपात करू शकत नाही.
असा प्रकार झाल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. “बैल दगावला तर पुन्हा बैल घ्या, गाय गमावली तर गायच घ्या – हीच खरी मदतीची दिशा आहे,” असे सांगत त्यांनी भावनिक आवाहनही केले.