पाटणा पायरेट्सची ‘दब्ंग दिल्ली केसी’वर मात
वृत्तसंस्था/ हैदराबाद
प्रो कबड्डी लीग सिझन 11 मधील आपला दुसरा विजय मिळवताना पाटणा पायरेट्सने येथे दबंग दिल्ली केसीचा 44-30 असा पराभव केला. पाटणा संघाकडून देवांक आणि अयान या दोघांनी प्रत्येकी 12 गुण मिळविले. दोन्ही बाजूंनी काही निष्फळ चढायांनी सुरुवात केली, त्यानंतर अयानने पाटणा पायरेट्ससाठी पहिला गुण मिळविला. पाटणा संघाने सुरुवातीच्याच कालावधीत कमी असली, तरी आघाडी घेतली.
दबंग दिल्ली केसीला आशू मलिकने त्यांचे पहिले काही गुण मिळवून दिल्यानंतर तेही पाटणाच्या अगदी जवळ येऊन ठेपले होते. त्यातच विनयच्या एका चढाईने दबंग दिल्ली केसी संघाची पिछाडी कमी केली. 10 मिनिटांचा खेळ संपला तेव्हा ते 3 गुणांनी पिछाडीवर होते. पण अयान, देवांक आणि संदीप यांच्या कामगिरीच्या जोरावर पाटणा पायरेट्सने आपली आघाडी वाढविणे कायम ठेवले. मध्यंतरापर्यंत पाटणा पायरेट्सने 21-13 अशी आघाडी घेतली होती.
ब्रेकनंतर दबंग दिल्ली केसीने त्यांच्या बाजूने वेग वाढवला. त्यांनी पहिल्या काही मिनिटांत आशू मलिकद्वारे तीन झटपट गुण घेतले. पण दुसऱ्या सत्रातील पाच मिनिटांनंतर पाटणा पायरेट्सनीही सावरत गती घेतली. खेळाच्या अंतिम टप्प्यात पाटणा पायरेट्ससाठी अयान आणि देवांक, तर दबंग दिल्ली केसीसाठी आशू मलिक यांनी ‘सुपर 10’ गुणांची नोंद केली. विनयने आशूला चांगली साथ दिलेली असली, तरी पाटणा पायरेट्सने वर्चस्व गाजविणे कायम ठेवले. पाच मिनिटे बाकी असताना पाटणा पायरेट्सने 13 गुणांची आघाडी घेतली आणि अखेरीस त्यांनी आरामात विजय मिळवला.