For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाटकर-आलेमाव आज दिल्लीत,उमेदवार घोषित होण्याची शक्यता

11:39 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाटकर आलेमाव आज दिल्लीत उमेदवार घोषित होण्याची शक्यता
Advertisement

मडगाव : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे आज शुक्रवारी दिल्लीला जात असून दोघेही काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीत उपस्थिती लावणार आहेत. दक्षिण गोव्यात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी अचानक प्रियांका गांधी यांचे नाव पुढे करण्यात आले. मात्र, यात तथ्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक पातळीवरूनच हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपने महिला उमेदवार दिल्याने काँग्रेस पक्षाने देखील महिला उमेदवार द्यावा आणि त्यासाठी प्रियांका गांधी यांचे नाव पुढे करण्यात आले असले तरी त्यात काहीच तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी दक्षिण गोव्यातून तीन नावे चर्चेत आहेत. त्यात विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर व कॅप्टन विरियातो फर्नांडिस. गिरीश चोडणकर यांनी आपण तब्बल 30 वर्षांनंतर प्रथमच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी मागणी केल्याचे सांगितले आहे. गिरीश चोडणकर यांचे राहूल गांधी यांच्याशी असलेले संबंध पाहता, त्यांनाच दक्षिण गोव्याची उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारली जात नाही. आपल्याला उमेदवारी मिळणार या अपेक्षेनेच त्यांनी दक्षिण गोव्यातील विविध मतदारसंघांत भेट देऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केली आहे. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनीही मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. गिरीश चोडणकर व कॅप्टन विरियातो यांच्या तुलनेत खा. फ्रान्सिस सार्दिन शांत आहेत. आपली ही शेवटची निवडणूक असल्याने पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.