हिरण्यकेशीचा कारभार पाटील-कत्तींकडे
सहकारी तत्त्वावरच कारखाना चालवणार : सर्व संचालकांचा निर्णयास पाठिंबा
संकेश्वर : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना ए. बी. पाटील व रमेश कत्ती यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. सहकार तत्त्वावर आधारित कारखाना चालवण्यात येणार आहे. अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळाकडूनच कारखान्याचा कारभार सुरळीतपणे चालू ठेवणार आहोत. सर्व संचालकांचा या निर्णयास पाठिंबा आहे. आगामी गळीत हंगामात 10 लाख मे. टन उसाचे गाळप करण्यात येणार असून कारखान्याला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी 150 कोटी रुपयांचा निधी उभा करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सोमवारी हिरण्यकेशीच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पाटील पुढे म्हणाले, अप्पणगौडा पाटील, एम. पी. पाटील, बसगौडा पाटील, विश्वनाथ कत्ती आदी सहकार नेत्यांनी या कारखान्याची उभारणी केली. या कारखान्यावरच आम्ही सर्व आमदार, खासदार व मंत्री झालो आहोत. या कारखान्याने अद्यापही आमदार, खासदार करण्याची परंपरा जपली आहे. यामुळे हा कारखाना पाटील-कत्ती घराण्याकडून अखेरपर्यंत सहकारी तत्त्वावरच चालवण्यात येणार आहे यात शंका नाही. कारखान्याच्या हितासह ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी यांच्या हिताची जपणूक होणार आहे. गत काही महिन्यांपासून शेतकऱ्यांनी पाटील-कत्ती घराणे एकत्र यावे, अशी सातत्याने मागणी केली होती. अखेर आम्ही सुरुवातीला एकाच घराण्याचे होतो व आता एकत्र आलो आहोत. या एकतेतून हुक्केरी तालुक्यातील सहकार क्षेत्राची निश्चित वृद्धी करणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.
निधी उभारणीसाठी प्रयत्न सुरू
हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याला सध्या 150 कोटीचे आर्थिक भांडवल आवश्यक असून हा निधी उभा करण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहोत. आगामी काही दिवसात कारखान्याचा कारभार अधिक गतिमान होणार आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यासह सभासदांनी कारखान्याच्या हितासाठी सहकार्य करावे. आपला ऊस बाहेर न जाता हिरण्यकेशीला मिळावा यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
निवडणुकीत आपले झेंडे वेगळे असणार
सहकार संस्थाच्या प्रगतीसाठी यापूर्वी आणि या पुढेही पाटील-कत्ती घराणे एकत्रितरित्या कार्य करणार आहेत. वीज संघाची निवडणूक घोषित होताच त्यावेळी त्याचा निश्चित विचार केला जाईल. हिरण्यकेशी चालवण्याच्या दृष्टीने आपण निश्चितपणे प्रयत्न करत आहोत. निवडणुकीच्या काळात ए. बी. पाटील काँग्रेसचे व मी भाजपचा यामुळे निवडणुकीत आपले झेंडे वगळे असणार यात शंका नाही. तेव्हा या एकत्रिकरणात राजकीय पक्षाचा कोणताही एक संबंध नाही. संचालक, शेतकरी व सभासदांना विश्वासात घेऊन मी व ए. बी. पाटील कार्य करणार आहोत. यावर कोणीही शंका घ्यायची गरज नाही, असे माजी खासदार रमेश कत्ती यांनी स्पष्ट केले.
जोल्ले-संचालकांत मतभिन्नता अन् निर्णय
मध्यतंरीच्या काळात माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी हा कारखाना चालवण्यासाठी प्रमुख भूमिका घेतली होती. पण संचालक व त्यांच्यात काही मतभिन्नता निर्माण झाली. यानंतर हिरण्यकेशीला आर्थिक पतपुरवठा करणे शक्य नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले. यामुळे या कारखान्याच्या जबाबदारीतून ते स्वत: मुक्त झाले आहेत. संचालकांनी एकत्र येऊन माझी भेट घेतली व आपल्या नेतृत्वाखाली कारखाना चालवावा, अशी आग्रही भूमिका घेतल्यामुळे संचालकासह रमेश कत्ती, निखिल कत्ती यांच्याशी सौहार्दपूर्ण चर्चा करून आपण एकत्र येत कारखान्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले.