वाहतुकीच्या कोंडीत बाराही महिने अडकलेला पटेल चौक !
सांगली / संजय गायकवाड :
सांगलीच्या बाजारपेठांना जोडणारा आणि मध्यवर्ती चौक म्हणून ओळख असलेल्या सांगलीतील ऐतिहासिक पटेल चौकाला बाराही महिने वाहतुकीच्या कोंडीने विळखा घातलेला आहे. महापलिकेच्या स्थापनेनंतर गेल्या सत्तावीस वर्षामध्ये पटेल चौकातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यात महापालिका व वाहतूक पोलीस शाखा यांना यश आलेले नाही. चौक सुधारण्याची आवश्यकता आहे. पटेल चौक रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. एकेरी वाहतूक करूनही चौकाला शिस्त लागलेली नाही. येथील वाढत्या अतिक्रमणाबाबत मनपा प्रशासनाकडून तातडीने हालचाल करून अतिक्रमणे दूर करण्याची गरज आहे.
सांगलीतील बाजारपेठांना जोडणारे जे प्रमुख चौक आहेत. त्यातील पटेल चौक हा मुख्य चौक आहे. सांगलीच्या राजवाडा चौकासह गणपती पेठ, जामवाडी, वखारभाग, हायस्कूल रोड, अशा गजबजलेल्या बाजारपेठा आणि चौकांना जोडणारा चौक म्हणून पटेल चौकाची ओळख आहे.
सांगलीतील महापालिका, शहर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ व राजवाडा चौकाकडून जामवाडी आणि वखारभागाकडे जाणारी सर्व वाहने ही पटेल चौकातून पुढे जात असतात. त्याशिवाय राजवाड्यातून येणारी आणि रटेशन रोडकडून गणपती पेठ आणि जामवाडीच्या दिशेला जाणारी वाहनेही पटेल चौकातूनच पुढे जात असतात.
तर गणपती पेठेकडून राजवाडा चौक, वखारभाग आणि स्टेशन रोडकडे जाणाऱ्या वाहनांनाही याच चौकातून वळावे लागते. त्यामुळे या चौकात वाहनांची दिवसभर मोठी गर्दी असते.
सांगली स्टैंडकडून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस पूर्वी पटेल चौकातून बुरूड गल्लीतून जात होत्या. काही महिन्यापासून या गाड्या आता कॉलेज कॉर्नरवरून बायपास रोडने नव्या पुलावरून जात आहेत. पण जामवाडी, गणपती पेठ आणि वस्त्रारभागातील वाढत्या वाहनांचा ताण या चौकावर कायम आहे. येथे वाहतूक पोलीस असूनही वाहनांची संख्याच मोठ्या प्रमाणात असल्याने चौकाला वाहतूक कोंडीने ग्रासले आहे.
पटेल चौकामध्ये हातगाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वास्तविक हातगाड्यांनी फिरते रहायला हवे. पण येथे दिवसभर हातगाड्या उभ्या राहिलेल्या असतात. त्यामुळे येथून वाहनांना वळताना अडचणीचे होते. येथे बाजूलाच होलसेल मार्केट आहे. राजवाडा चौकापासून पटेल चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना अतिशय संथ गतीने जावे लागते. तसेच पटेल चौकातून जामवाडीकडे जाणाऱ्या वाहनांनाही कर्नाळ रोड पोलीस चौकीपर्यत वाट काढताना नाकी नऊ येते.
पटेल चौकामध्ये पार्किंगची चांगली सोय नाही. त्यामुळे या चौकानजिक सर्व दुकानांसमोरच वाहने उभी करावी लागतात. त्यात वाहतूक पोलिसांची क्रेन येऊन कधी गाडी उचलतील, याचा नेम नाही. पटेल चौकानजिक अनेक बँका, पतसंस्था, कृषी उत्पादनाची दुकाने, हार्डवेअर आणि स्पेअर पार्टची दुकानेही आहेत. पटेल चौकापासून सिंधी मार्केट, पुढे तानाजी चौक व गणपती पेठ, अशी होलसेल खरेदीची ठिकाणे आहेत.
त्यामुळे गणपती पेठेतून बाहेर पडणाऱ्या मालमोटारी आणि तिकडे जाणाऱ्या गाड्या यांची ये-जा याच चौकातून होत असते. या चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवूनही उपयोग नाही. येथील अतिक्रमणे दूर करण्याची आवश्यकता आहे. चौक रूंदीकरणालाही फारसा वाव नाही. मनपा आयुक्त सत्यम गांधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी संयुक्तरित्या सांगलीतील चौकांची प्रत्यक्ष पाहणी करून चौकांना शिस्त लावण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी सांगलीकर नागरिक व वाहनचालकांतून करण्यात येत आहे.