Satara : पालकमंत्र्यांच्या मार्गावरील 'लाल बावटा हटवला', PWD विभागाला खडबडून जाग
ठेकेदाराने सकाळी लाल बाबटा काढून सिमेंट काँक्रीट टाकून खड्डा बुजबला
उंब्रज : ज्या राज्यमार्गाने साताऱ्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटन मंत्री आठवड्यातून किमान एक-दोन वेळा ये-जा करतात, त्या पाटण-पंढरपूर राज्यमार्गावरील उंब्रज हद्दीत पडलेल्या खड्यात अपघात होऊ नयेत म्हणून नागरिकांनी लाल बावटा उभा केला होता.
'तरुण भारत'ने याचे सचित्र वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या ठेकेदाराने मंगळवारी सकाळी हा लाल बाबटा काढून सिमेंट काँक्रीट टाकून खड्डा बुजबला. त्यामुळे वाहनधारक, नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पाटण-पंढरपूर राज्यमार्गावर उंब्रज येथे ठिकठिकाणी खड्डे व खाचखळगे पडले आहेत. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जाते. एका खासगी स्कूलसमोर मोठा खड्डा पडून या खड्यात दोन दिवसात अनेक दुचाकीस्वार आदळून अपघात झाले. त्यामुळे काही सुजाण नागरिकांनी सोमवारी या खड्यात लाल बावटा उभा करून वाहनधारकांना सुरक्षित दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला.
या लाल बावट्याची बातमी 'तरुण भारत'ने प्रसिद्ध करून नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते. दरम्यान, मुसळधार पावसाने उंब्रज येथे पाटण तिकाटणे ते रविदीप ढाबा या अर्धा किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यातील काही तीन महिन्यांपूर्वी मातीमिश्रीत खडी टाकण्यात आली. परंतु उन्हाळ्यात मातीमिश्रीत खडीने प्रचंड धूळ उडाली.
आता पहिल्याच पावसात दुरुस्तीचे पितळ उघडे पडले आहे. येथे पुन्हा मोठमोठे खड्डे दिसू लागले आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनाही या रस्त्याने सतत मतदारसंघात ये-जा करावी लागते; परंतु त्यांच्या मार्गावरच हे खड्डे असल्याने त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. पालकमंत्री आठवड्यातून किमान एक-दोन वेळा या रस्त्याने ये-जा करतात.
तरीही संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या रस्त्यावरून चोवीस तास सर्व प्रकारची वाहतूक सुरू असते. त्यामुळे दररोज हजारो बाहने ये-जा करतात. तसेच या रस्त्यावर एका खासगी संस्थेचे सांडपाणी सोडले जाते. या पाण्यामुळे उन्हाळ्यातही या परिसरात खड्यांचे साम्राज्य असते.
गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने या खबुड्यांत पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांत खड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर आपटले. चारचाकी वाहनांचीही आदळआपट सुरू झाल्याने काही सुजाण नागरिकांनी सोमवारी खड्ड्यात काठ्या उभ्या करून त्याबर लाल फडके टाकले.
या लाल बाबट्याने वाहनधारक नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमलेल्या ठेकेदार कंपनीने घेऊन मंगळवारी सकाळी खड्यात सिमेंट काँक्रीट टाकण्यास सुरुवात केली व लाल बावटा हटवला. अपघातांना निमंत्रण देणारा खड्डा बुजवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे
रस्त्यावरील सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
उन्हाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. काही ठिकाणी खडीमिश्रीत माती निसटून धूळ निर्माण होऊन रस्त्याच्या दुतर्फा असणारे व्यावसायिक, पादचारी व वाहनधारक हैराण झाले. या रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या रस्ताची दुरुस्ती करून संबंधितांनी रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.