For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई काँग्रेसला तरच गतवैभव

06:52 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबई काँग्रेसला तरच गतवैभव
Advertisement

एकामागुन एक धक्के बसणाऱ्या मुंबई काँग्रेसचे मुंबईत कधी काळी एकहाती वर्चस्व होते. मुरली देवरा, गुरूदास कामत, एकनाथ गायकवाड, सुनिल दत्त यांच्या नेतृत्वामुळे मुंबईत काँग्रेसला अच्छे दिन आले. मात्र 2014 च्या मोदी लाटेनंतर बॅकफुटवर गेलेल्या काँग्रेसला मुंबईत आणि राज्यात आपले संघटन टिकवता आले नाही. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसमधील विस्कळीतपणा समोर आला आहे. 2009 पर्यंत मुंबईच्या राजकारणात वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला आता घरघर लागली आहे. आज ही घरघर रोखण्यासाठी मुंबई काँग्रेसकडे कोणताही सक्षम नेता नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही या पक्षाच्या नेतृत्वाने पुन्हा नव्याने सुरूवात केली मात्र राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या काँग्रेसची मुंबईत मात्र अवस्था बिकट आहे.

Advertisement

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाली आणि काँग्रेसची नाराजी पुन्हा समोर आली. माजी मंत्री नसीम खान यांनी स्टार प्रचारक समितीचा राजीनामा दिला असून, त्यांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील सहा लोकसभा जागांचा विचार करता महाविकास आघाडीत शिवसेनेने ईशान्य मुंबईत मतदार संघातून संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून अमोल किर्तीकर अशा मुंबईतील 6 पैकी 4 जागांवर शिवसेनेने आपले उमेदवार घोषित केले. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य हे दोन लोकसभा मतदार संघ काँग्रेसला देण्यात, काँग्रेसला या दोन मतदार संघासाठी उमेदवार न मिळणे तसेच जे इच्छुक आहेत, त्यांना डावलल्यामुळे काँग्रेसमधील नाराजी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीचे उमेदवार घोषित झाल्यानंतर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, विश्वजित कदम यांनी थेट दिल्ली दरबारी जाऊन आपले गाऱ्हाणे मांडले. वर्षा गायकवाड या दक्षिण मध्य मुंबईतून इच्छुक होत्या या लोकसभा मतदार संघातील धारावी या विधानसभा मतदार संघातून त्या सलग तिसरी टर्म आमदार आहेत तर माजी खासदार संजय निरूपम हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून इच्छुक होते. मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार आधीच घोषीत केल्याने अखेर काँग्रेसच्या निरूपम यांनी अमोल किर्तीकर आणि संजय राऊत यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत पक्षत्याग केला तर नसीम खान यांनी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करत आपला स्टार प्रचारक समितीचा राजीनामा दिला. म्हणजे काँग्रेसने मुंबईत एकाही जागेवर योग्य उमेदवार दिला नसल्याचे दिसत आहे, कर्नाटक लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना मात्र महाराष्ट्रात  भाजपविरोधात संघर्ष करायचा नाही. केवळ सत्ता आल्यानंतर महत्त्वाची पदे यासाठी बंड करायची हेच काँग्रेसमध्ये चालत आले आहे. मुंबई काँग्रेसचे नेत्यांमध्ये सुनिल दत्त, मुरली देवरा, गुरूदास कामत, कृपाशंकर सिंग यांनी पक्ष वाढविण्याचे काम केले. मुंबई काँग्रेसमध्ये देवरा आणि कामत गट हे इतके प्रभावी होत आहेत की या गटांमधील शहकाटशहांच्या स्पर्धेत अनेकांचा राजकीय बळी गेला. ज्या गटाचा प्रभाव असायचा त्या गटाचेच सत्तेत वर्चस्व असायचे. 2014 नंतर मात्र नरेंद्र मोदी आणि भाजपची सत्ता आल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी भाजपशी संघर्ष करण्याचे टाळले. कर्नाटकमध्ये काँग्रेस नेते डी के शिवकुमार हे भाजपशी संघर्ष करतात, तुरूंगात जातात, त्यांचाच करिष्मा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चालला. मात्र महाराष्ट्रात आता कोणाचा करिष्मा करणारा नेता नाही आणि कोणी त्या भानगडीतही पडत नाही. अधिवेशन काळात सरकारचा विरोध करताना काही ठराविक आमदार दिसत असत, नेत्यांची मुले असणारी धीरज देशमुख, अमित देशमुख, झिशान सिद्दीकी हे कधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिसलेच नाही. महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी तसेच पदांसाठी पक्षांतर्गत संघर्ष पहायला मिळतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात केवळ एक खासदार निवडून आलेल्या काँग्रेसने मात्र त्यानंतर बोध घेऊन पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी ठोस कार्यक्रम देण्याची गरज होती. मात्र केवळ सत्ता आणि पदासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कलेने घेत आपले मोठे नुकसान कऊन घेतले. काँग्रेसची पारंपारिक व्होट बँक असलेले मुंबईतील मुस्लिम मतदार आज उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सरकले आहेत. मुंबईत मुस्लिमांची मते ही नेहमीच निर्णायक ठरली आहेत, ही मते आपल्या बाजुने असल्याचा आत्मविश्वास उध्दव ठाकरेंना असल्यानेच त्यांनी मुंबईतील 6 पैकी 4 जागांवर आपली दावेदारी सांगितली. अमोल किर्तीकर, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि संजय दिना पाटील यांना उमेदवारी देऊन थेट काँग्रेसला खिजगणतीतही पकडले नाही कारण ठाकरे यांना काँग्रेसमधील नेतृत्वाचा आणि त्यांच्या नेत्यातील समन्वयाचा चांगलाच अनुभव आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी नव्याने सुरूवात केली. काँग्रेसला मात्र 2014 आणि 2019 च्या पराभवानंतरही स्वत:ला सावरता आलेले नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत राज्यातही बळ देण्याचे काम केले पण राज्यातील काँग्रेस नेते मात्र शहकाटशहच्या राजकारणात मग्न असतात. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 6 पैकी 5 खासदार असलेल्या काँग्रेसला उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवार मिळत नाही, जे लढण्यास इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी द्यायची नाही ज्यांचा जिथे प्रभाव आहे, त्यांना तिथे उमेदवारी न देता इतर मतदार संघात पाठवायचे, याच राजकारणाला आता काँग्रेसचे कार्यकर्ते वैतागले आहेत. नाशिक पदवीधर विधानपरिषद आमदार निवडणुकीच्या वेळी सुधीर तांबे यांनी आपले पुत्र सत्यजित तांबे हे इच्छुक असल्याचे सांगितल्यानंतरही पक्षाकडून एबी फॉर्म आणि उमेदवारी सुधीर तांबे यांना दिली गेली पण तांबे यांनी अर्ज न भरता शेवटी पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरत भाजपच्या मदतीने निवडून आले. तांबे यांच्या उमेदवारीमागे काँग्रेसमधील अंर्तगत वाद होता मात्र यात नुकसान पक्षाचे झाले. मराठीत एक म्हण आहे, त्याप्रमाणे नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे या पध्दतीने काँग्रेसच्या नेत्यांचे राजकारण चालत आले. मुंबईत काँग्रेसला जर आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर केवळ नेतृत्वात बदल कऊन उपयोग नाही तर यापुढे संघटन वाढीबरोबरच जुन्या नव्या नेतृत्वाला विश्वासात घेण्याची गरज आहे. आज शरद पवारांनी प. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढताना जुन्या नेत्यांना पुन्हा विश्वासात घेत ठिकठिकाणी भाजपसमोर आव्हान निर्माण केले आहे. मुंबईत काँग्रेसला लागलेली घरघर रोखण्यासाठी काँग्रेसने ठोस पावले उचलली तरच काँग्रेसला गतवैभव प्राप्त होईल.

Advertisement

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.