30 मिनिटांत प्रवाशांना मिळावे लगेज
एअरलाईन्सना बीसीएएसकडून कठोर निर्देश : प्रवाशांना होणार सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्लाईट लँड केल्यावर प्रवाशांना त्यांचे चेक-इन लगेज मिळण्यास होणाऱ्या विलंबाची दखल ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने (बीसीएएस) घेतली आहे. 10 ते 30 मिनिटांच्या आत प्रवाशांना त्यांचे रजिस्टर्ड लगेज मिळावे असे निर्देश बीसीएएसने 7 भारतीय एअरलाईन्सना दिले आहेत. याकरता 10 दिवसांची मुदत देत बीसीएएसने 26 फेब्रुवारीपर्यंत या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. एअरलाईन्सने या निर्देशांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
एअर इंडिया, इंडिगो, अकासा, स्पाइसजेट, विस्तारा, एअर इंडिया एक्स्प्रेस कनेक्ट आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या 7 एअरलाईन्सना बीसीएएसने निर्देश जारी करणारे पत्र लिहिले आहे. ऑपरेशन, मॅनेजमेंट आणि डिलिव्हरी अॅग्रीमेट (ओएमडीए) नियमांचा दाखला देत फ्लाईट लँड केल्यापासून 10 ते 30 मिनिटांच्या आत प्रवाशांना चेक-इन लगेज मिळावे असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मागील काही काळापासून एअरलाईन्सकडून प्रवाशांना त्यांचे चेक-इन लगेज मिळविण्यास मोठा विलंब होत असल्याने तक्रारी वाढल्या होत्या.
प्रवाशांना होत असलेली असुविधा विचारात घेत बीसीएएसने हे दिशानिर्देश जारी केले आहेत. याप्रकरणी केंद्रीय नागरी उ•ाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली बीसीएएसने जानेवारी महिन्यापासून 6 मोठ्या विमानतळांवर बॅगेज सिस्टीमचे निरीक्षण सुरू केले होते. यात आता साप्ताहिक स्तरावरही आढावा घेतला जात आहे. बॅगेज सिस्टीमच्या डिलिव्हरीत पूर्वीच्या तुलनेत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरीही यात अद्याप मोठा वाव असल्याचे आढळून आले आहे. याचमुळे विमान लँड झाल्याच्या अर्ध्या तासाच्या आत प्रवाशांना चेक-इन लगेज मिळावे असा निर्देश देण्यात आला आहे.