प्रवाशांचे हाल, 400 फेऱ्या रद्द
कोल्हापूर :
कर्नाटकमध्ये एसटीच्या चालकाला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्रातून कर्नाटककडे जाणाऱ्या सर्व एसटी बस रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे रविवारी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. या निर्णयामुळे एसटीच्या कोल्हापुरातील 12 आगारातील 10 मार्गावरील 400 फेऱ्या रद्द झाल्या असून सुमारे 4 कोटींचे नुकसान झाले.
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या चालक-वाहकाला कन्नड समर्थक कार्यकर्त्यांकडून कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे मारहाण करत तोंडाला काळे फासण्याचा प्रकार घडला. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने महाराष्ट्रातून जाणाऱ्या सर्व एसटी बस रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानुसार शनिवारी रात्रीपासून कर्नाटककडे जाणारी बस सेवा बंद झाली.
शासकीय कार्यालयांना रविवारी सुट्टी असल्याने एसटीतील प्रवाशांची गर्दी असते. एसटी सेवा रद्द केल्याने कोल्हापुरातून कर्नाटकासह सीमा भागात जाणाऱ्या प्रवाशांचे रविवारी हाल झाले. काहींनी खासगी वाहतूक सेवेचा आधार घेतला. तर काही रिक्षा व्यावसायिकांनी सीमा भागापर्यंत प्रवाशांना सोडण्यात आले.
- कोल्हापुरातून या मार्गावरील बस फेऱ्या रद्द
कोल्हापूर-बेळगांव, संभाजीनगर बेळगांव, इचलकरंजी कागवाड, गडहिंग्लज-संकेश्वर, गडहिंग्लज-हात्तरगी, गरगोटी-निपाणी, चंदगड-बेळगांव, कुरूंदवाड-कागवाड, कागल-निपाणी, राधानगरी-निपाणी, आजरा-बेळगांव
मध्यवर्ती बसस्थानक येथून मोठ्या संख्येने प्रवासी बेळगांवसह सीमाभागात जातात. या ठिकाणी असणाऱ्या फलाट क्रमांक 10 येथे या एसटी थांबतात. रविवारी या ठिकाणी एकही बस नव्हती. मात्र, बस सेवा सुरू होईल या अपेक्षेने दिवसभर प्रवाशींची गर्दी दिसून आली.
- कर्नाटकातून मिरजेकडे बस सेवा सुरू
जिह्यातील सांगली, जत, मिरज आगारातून कर्नाटकात होणारी बससेवा महाराष्ट्र परिवहन विभागाने स्थगित केली आहे. तथापि, रायबाग तालुक्यातील चिंचणी येथे मायाक्का देवीच्या पाकाळणीसाठी जाणाऱ्या भाविकासाठी काही बस सोडण्यात आल्या. मात्र, अन्य ठिकाणी जाणाऱ्या बस स्थगित करण्यात आल्या आहेत. तथापि, महाराष्ट्रातून जाणाऱ्या बस बंद असल्या तरी कर्नाटक परिवहन विभागाच्या बस मिरज आगारापर्यंत येत असून त्यांच्याकडून प्रवासी वाहतूक सुरू होती. प्रवाशांची गैरसोय होउ नये यासाठी या बस सुरू ठेवण्यात आल्याचे कर्नाटकातील चालक-वाहकांनी सांगितले. विजयपूर, चिकोडी, अथणीसाठी ही बस सेवा उपलब्ध होती. कर्नाटक परिवहन विभागाने मिरज आगारात बससेवा सुरूळीत ठेवण्यासाठी एक खास निरीक्षकही नियुक्त केला असून आलेली बस प्रवासी भरून मार्गस्थ करण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे.