For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्टार एअरलाईन्सकडून प्रवाशांचा खेळखंडोबा

12:42 PM Jan 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्टार एअरलाईन्सकडून प्रवाशांचा खेळखंडोबा
Advertisement

आजची बेळगाव-जयपूर विमानफेरीही रद्द केल्याने प्रवासी अडचणीत : एका आठवड्यात दोन विमानफेऱ्या रद्दमुळे संताप

Advertisement

बेळगाव : बेळगाव विमानतळावरून सेवा देणाऱ्या विमान कंपनीमुळे प्रवासी त्रस्त आहेत. पूर्वसूचना न देता विमानफेरी रद्द करणे, तांत्रिक बिघाडाचे कारण देत विमानतळावरून प्रवाशांना माघारी पाठविणे, असे प्रकार घडत आहेत. यामुळे बऱ्याचवेळा विमानतळावर वादावादी होत आहे. विमान कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे बेळगाव विमानतळाच्या नावाला बाधा पोहोचत असल्यामुळे आता अधिकाऱ्यांनीच कानउघाडणी करणे गरजेचे आहे. स्टार एअरने एका आठवड्यात सलग दोन विमानफेऱ्या रद्द केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी बेळगाव-जयपूर मार्गावरील विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांना घरी पाठविण्यात आले.

तर गुरुवार दि. 23 रोजीची बेळगाव-जयपूर विमानफेरी रद्द करण्यात आली आहे. वारंवार विमानफेऱ्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांचा संताप अनावर होत आहे. सध्या बेळगाव विमानतळावरून इंडिगो व स्टार एअर या दोन कंपन्या सेवा देत आहेत. परंतु स्टार एअर या विमान कंपनीच्या अनेक सेवा प्रवाशांचा विचार न करता रद्द केल्या जात आहेत. सध्या ही कंपनी तिरुपती, जयपूर, मुंबई, नागपूर या शहरांना विमानसेवा देत आहे. अचानक विमानफेरी रद्द केल्याने प्रवाशांचे नुकसान तर होत आहेच. त्याचबरोबर पुढील हॉटेल, तसेच प्रवासाचे सर्वच बुकिंग रद्द करावे लागत आहे. यामुळे बेळगाव विमानतळाच्या नावालाही बाधा येत आहे.

Advertisement

समस्येवर तोडगा काढण्याची मागणी

स्टार एअरचे विमान गुरुवार दि. 23 रोजी बेळगाव-जयपूर या मार्गावर सेवा देणार होते. प्रवाशांनी काही दिवसांपूर्वीच या विमानफेरीचे बुकिंग केले होते. परंतु बुधवारी विमानफेरी तांत्रिक कारणाने रद्द करण्यात आली असल्याचा ई-मेल प्रवाशांना पाठविण्यात आला. यामुळे पुढील सर्वच प्रवास प्रवाशांना रद्द करावा लागला आहे. वारंवार अशा विमानफेऱ्या रद्द होत असल्याने यावर तोडगा काढण्याची मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.

Advertisement
Tags :

.