जर्मनीत जंगलभागात प्रवासी रेल्वे घसरली
तिघे ठार, 50 हून अधिक जखमी
वृत्तसंस्था/ बर्लिन
जर्मनीच्या नैर्त्रुत्य भागात रविवारी उशिराने एक मोठा रेल्वे अपघात झाला. सिग्मरिंगेनहून उल्मकडे जाणारी एक प्रवासी रेल्वे जंगलभागातून जात असताना रुळावरून घसरली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त रेल्वेमधून सुमारे 100 लोक प्रवास करत होते. रिडलिंगेन शहराजवळ हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली. जंगलभागातील भूस्खलनामुळे ही दुर्घटना घडली असून रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर लगेचच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी पोहोचली. स्थानिक टीव्ही चॅनेल एसडब्ल्यूआरनुसार, 50 हून अधिक जखमींना हेलिकॉप्टरने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. काही जखमींना गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या 40 किमी परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली होती. रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जर्मनीच्या अनेक भागात भूस्खलन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण जर्मनीतील हवामान या दिवसांत खूपच खराब असते.