मिरज रेल्वे स्थानकावर विद्युत तारेला स्पर्श करून प्रवाशाची आत्महत्या
मिरज :
मिरज रेल्वे स्थानकावर मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. एका अनोळखी प्रवाशाने मालगाडीवर चढून सुमारे ४०,००० व्होल्टेज क्षमतेच्या विद्युत तारेला हात लावून आत्महत्या केली. उच्चदाबाच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर जागीच जळून कोळसा झाले.
ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर घडली. माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी काळे आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानुसार, संबंधित प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या वॅगनवर चढून विद्युत तारेला हात लावला. त्यामुळे त्याला जबरदस्त विजेचा धक्का बसून तो जमिनीवर कोसळला आणि जागीच मृत्यू झाला.
मृत व्यक्तीचा संपूर्ण देह जळून खाक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रवासी मिरज–कोल्हापूर पॅसेंजर गाडीतून उतरलेला होता. अंदाजे वय ४० वर्षे असून चेहऱ्यावर दाढी आहे. मात्र, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
मिरज लोहमार्ग पोलीस संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन करत आहेत. या घटनेमुळे मिरज रेल्वे स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास मिरज लोहमार्ग पोलीस करीत आहेत.