महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वांना विश्वासात घेऊनच ठराव मंजूर करा

11:05 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महानगरपालिकेतील विरोधी गटाच्या नगरसेवकांनी उठविला जोरदार आवाज : माजी महापौर-उपमहापौरांवर बैठकीत खोचक टीका

Advertisement

बेळगाव : महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ठराव करताना विरोधी गटातील नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. त्याठिकाणी करण्यात आलेले ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये केवळ वाचन करून मंजूर केले जात आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. तेव्हा आमचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतरच ठराव संमत करावेत, अशी जोरदार मागणी महानगरपालिकेतील विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी यांनी केली. यावरून गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये बराचवेळ गोंधळ उडाला. महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीमध्ये विरोधकांना बोलायचा अधिकार आहे का नाही? असा प्रश्न नगरसेवक शहीदखान पठाण यांनी केला. मनपा स्थायी समितीच्या बैठकीचे नियम काय आहेत?, सर्वसाधारण बैठकीमध्ये आम्ही प्रश्न विचारायचे की नाही?, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची नोंद होते की नाही? असे प्रश्न विरोधी गटाच्या नगरसेवकांनी केले. त्यावर कायदा सल्लागार अॅड. महांतशेट्टी यांनी साऱ्यांनाच गोंधळात टाकणारी उत्तरे दिली. त्यामुळे नेमके सभागृहामध्ये काय चालले आहे, याचा कोणालाच अंदाज आला नाही. सदर बैठक केवळ गोंधळाच्या वातावरणामध्ये सुरू झाली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू होती. बैठक सुरू झाल्यापासूनच आरोप-प्रत्यारोप आणि बैठकीचा मुद्दा सोडूनच म्हणणे मांडण्याचे सुरू होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती.

Advertisement

माजी महापौर-उपमहापौरांवर खोचक टीका

विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी यांनी बेळगावचा सर्वांगीण विकास झाला आहे. माजी महापौरांना 1 कोटींचा निधी, माजी उपमहापौरांना 50 लाखांचा निधी, 13 नगरसेवकांना प्रत्येकी 30 लाख रुपये असे निधीचे वाटप करण्यात आले. त्यामुळेच हा विकास झाला आहे, अशी खोचक टीका माजी महापौर-उपमहापौरांवर करत त्यांचा सत्कार करणार आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे सत्ताधारी गटाने त्याविरोधात जोरदार आवाज उठविला. तुम्ही काँग्रेसचे आहात, काँग्रेस सरकारकडून स्वतंत्र निधी आणा म्हणून या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या अध्यक्षांविरोधात तक्रार

सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या अध्यक्षांनी आपला अवमान केला आहे. मला बैठकीमध्ये प्रवेश करताना थांबविण्यात आले. कायदा सल्लागारांचा सल्ला घ्या आणि त्यानंतर बैठकीला उपस्थित रहा, असे अध्यक्षा वाणी जोशी यांनी मला सांगितले. त्यामुळे माझा अवमान झाला आहे, अशी तक्रार नगरसेवक शहीदखान पठाण यांनी या बैठकीत केली. त्यावर अध्यक्षांनीही जोरदार विरोध करत आम्ही कोणाचा अवमान केला नाही, असे सांगितले. मात्र विरोधकांनी त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर यापुढे असा प्रकार होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असे सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी सांगितले. दुपारपर्यंत बैठकीमध्ये केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. शहराच्या विकासाबाबत सत्ताधारी किंवा विरोधी गटाला काहीच पडले नसल्याचे दिसून आले. एकूणच सभागृह कशाप्रकारे चालविले जाते, याचा अनुभव कमी असल्याचे या बैठकीत दिसून आले. महापौर सविता कांबळे यांनी पहिल्याच बैठकीत आपली चुणूक दाखविली. त्यांनी सर्वच नगरसेवकांना सभागृहाची शिस्त पाळा, एखादा नगरसेवक आपले म्हणणे मांडत असेल तर दुसऱ्या नगरसेवकांनी त्यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे सांगितले. याचबरोबर त्यांनी काही प्रश्नांची उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांना देण्यास भाग पाडले. त्यामुळे सभा कशी चालवावी, याचा अनुभव असल्याचे दिसून आले. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, मनपा आयुक्त पी. एन. लोकेश, उपायुक्त उदयकुमार तळवार, नगरसेवक अजिम पटवेगार, रवी साळुंखे, रेश्मा बैरकदार, हणमंत कोंगाली, राजशेखर डोणी, रवी धोत्रे, शंकर पाटील यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.

प्रभागांच्या निधी वाटपावरून विरोधी गटाचा सभात्याग

महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी सर्व निधी आपल्याच नगरसेवकांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांनी त्यावर जोरदार आवाज उठविला. मात्र सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी विरोधी गटाचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिल्याने विरोधी गटाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामुळे गुरुवारी झालेल्या बैठकीत घाईगडबडीतच सत्ताधारी गटाने निधी मंजुरीचा ठराव पास केला आहे. शहरातील प्रभागांसाठी समान निधीचे वाटप होणे गरजेचे आहे. मात्र सत्ताधारी गटाने केवळ आपल्यासाठीच निधी घेतला आहे. माजी महापौरांनी 1 कोटी, माजी उपमहापौर यांनी 50 लाख तर 13 नगरसेवकांना प्रत्येकी 30 लाख दिले गेले आहेत. त्याविरोधात विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी यांनी जोरदार आक्षेप घेतला. तत्पूर्वी 15 व्या वित्त आयोगातून निधी मंजुरी देण्यात आली. मात्र मनपाच्या वरील निधीवरून जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर विरोधी गटाच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी देत सभात्याग केला.

सन्मान हॉटेल, पहिल्या रेल्वेगेटवरील बॅरिकेड्सबाबत जोरदार चर्चा : दोन्ही ठिकाणचे बॅरिकेड्स हटविण्याची मागणी

कॉलेज रोडवरील सन्मान हॉटेलसमोरील दुभाजकाला बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना वळसा घालून जावे लागत आहे. या परिसरातील व्यावसायिकांनी आणि वाहन चालकांनीही तेथील बॅरिकेड्स हटवावेत अशी मागणी केली आहे, अशी माहिती नगरसेवक शंकर पाटील यांनी महानगरपालिकेच्या बैठकीत दिली. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे यांनीही पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स हटवावेत, अशी मागणी केली. कॉलेज रोडवरून न्यायालयाकडे, मुख्य बाजारपेठला जाताना सर्वांनाच त्याचा फायदा होत होता. याचबरोबर सन्मान हॉटेलच्या मागील बाजूस अनेक हॉस्पिटल आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांची ये-जा असते. काहीवेळा रुग्णवाहिकेतून अत्यवस्थ रुग्णांना जाण्यासाठी तो मार्ग महत्त्वाचा आहे. मात्र त्या ठिकाणीच बॅरिकेड्स उभे केले आहेत. त्यामुळे फेरा मारून जावे लागत आहे. तेव्हा त्याचा सारासार विचार करावा आणि तेथील बॅरिकेड्स हटवावेत, अशी मागणी नगरसेवक शंकर पाटील यांनी केली. पहिल्या रेल्वेगेटजवळही काँग्रेस रोडवर बॅरिकेड्स लावून रस्ता अडविला गेला आहे. त्यामुळे मंडोळी, गुरुप्रसाद कॉलनी, भवानीनगर परिसर, टिळकवाडी भागातील जनतेला त्याचा त्रास होत आहे. तेव्हा ते ही बॅरिकेड्स हटवावेत, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी केली आहे. एकूणच महानगरपालिकेच्या बैठकीत शहरात लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सवरून नाराजी व्यक्त करण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article