For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पशुपति पारस यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

06:37 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
पशुपति पारस यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा
Advertisement

स्वत:च्या पक्षावर अन्याय झाल्याचा दावा : विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील होण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रालोआच्या जागावाटपात एकही जागा न मिळाल्यावर आरएलजेपी प्रमुगा पशुपति पारस यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. माझ्या आणि माझ्या पक्षासोबत अन्याय झाला आहे. आम्हाला एकही जागा देण्यात आली नसल्याचे पारस यांनी म्हटले आहे. पशुपति पारस हे मोदी सरकारमध्ये अन्नप्रक्रिया मंत्री होते.

Advertisement

बिहारमध्ये चिराग पासवान यांच्या लोजप (रामविलास)करता 5 जागा सोडण्यात आल्याने पशुपति पारस हे नाराज झाले आहेत. रालोआकडून पारस यांच्या पक्षाकरता एकही जागा सोडण्यात आली नाही. तसेच जागावाटप घोषित करण्यापूर्वी त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला नव्हता.

17 भाजप तर संजद 16 जागा लढणार

बिहारमध्ये रालोआचे जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. यानुसार भाजप राज्यातील 17 जागा लढविणार आहे. तर संजदच्या वाट्याला 16 जागा आल्या आहेत. चिराग पासवान यांच्या पक्षाला 5 तर जीतनराम मांझी यांच्या हम या पत्राला 1 आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक जनता दलाकरता एक जागा सोडण्यात आली आहे.

पशुपति पारस हे पुतण्या चिराग यांना भाजपकडून मिळत असलेल्या प्राधान्यामुळे अस्वस्थ होते. स्वत:च्या पक्षाला बिहारमध्ये लोकसभेची एकही जागा रालोआकडून दिली जाणार नसल्याची कल्पना त्यांना आली होती. यानंतर पशुपति पारस यांनी स्वत:च्या पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक बोलाविली होती. तसेच या बैठकीनंतर पारस यांनी भाजप अध्यक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पक्षाच्या 5 खासदारांसंबंधी विचार करण्याचे आवाहन केले होते.

‘इंडिया’मध्ये जाणार का?

पशुपति पारस यांनी रालोआत काही जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले होते. तसेच त्यांनी योग्य सन्मान न मिळाल्यास आमचा पक्ष निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचा इशारा दिला होता. आता रालोआचे जागावाटप जाहीर झाल्याने त्यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. पशुपति पारस हे आता विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील होण्याचा विचार करत आहेत.

चिराग यांच्या पक्षाला 5 जागा

चिराग पासवान यांचा पक्ष बिहारमध्ये वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर, खगडिया आणि जमुई या मतदारसंघात निवडणूक लढविणार आहे. सध्या यातील 4 मतदारसंघांमध्ये पशुपति पारस यांच्या पक्षाचे नेते खासदार आहेत. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोजपमध्ये फूट पडली होती. यानंतर एका गटाचे नेतृत्व पशुपति पारस तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व चिराग पासवान करत आहेत.

Advertisement
Tags :

.