खोल समुद्रातही करता येणार पार्टी
120 अतिथींचे स्वागत करणार पाणबुडी
पाणबुडीचे नाव ऐकताच तुम्हाला केवळ युद्ध आणि शत्रूशी लढण्याचा विचार येतो, परंतु हा विचार आता झटकून टाका, कारण पार्टी आणि सेलिब्रेशनसाठी वापर करता येणाऱया पाणबुडीची आता निर्मिती करण्यात आली आहे. या पाणबुडीची निर्मिती नेदरलँड्समधील यु-बोट वोर्क्स या कंपनीने केली आहे. पाणबुडीचा वापर 120 लोकांची पार्टी आणि अन्य सोहळय़ांसाठी देखील करता येणार आहे.
या अनोख्या पाणबुडीचा रंग पिवळा असून याचा वापर विवाहसोहळे आणि अन्य समारंभांसाठी करण्यासह यात कॅसिनो आणि डिनरसाठी लोक येऊ शकतील. पाणबुडी बॅटरीने संचालित होणार असून यात अन्य अनेक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
पाणबुडीच्या आत एक वेडिंग हॉल तयार करण्यात आला आहे. 64 लोकांना सामावणारे एक रेस्टॉरंट यात असून जिमसोबत कॅसिनोचीही सुविधा यात असणार आहे. पाणबुडीमधील क्षेत्र 1600 चौरस फूटांचे असून याला अत्यंत उत्तमप्रकारे सजविण्यात आले आहे. पार्टीदरम्यान लोकांना खोल समुद्रातील दृश्य अनुभवता येणार आहे.
सलग 24 तास पार्टी केल्यावरही पाणबुडीची बॅटरी संपणार नाही. या पाणबुडीच्या माध्यमातून लक्झरी अनुभव प्राप्त करता येणार आहे. पाणबुडीची लांबी 115 फूटांची असून ती 650 फूट खोलीपर्यंत जाऊ शकते. पाणबुडीत 14 विंडोज असून याच्या माध्यमातून पुरेसा प्रकाश आत येऊ शकतो. लोकांना पाणबुडीत एक्सरसाइजही करता येणार असून निवांतपणे भोजन करण्याची यात सुविधा आहे.
कंपनीचे सीईओ बर्ट हाउटमॅन यांच्यानुसार अंडरवॉटर इव्हेंट्सचा हा प्रयोग लोकांना अत्यंत आवडणार आहे. येथे येणारे लोक क्रूजप्रमाणे पाणबुडीत फिरू शकतील. तर पाण्यावर असताना याच्या छतावर उभे राहून समुद्राचे दृश्य डोळय़ात साठविता येणार आहे. येथे एक सनलाइट झोन देखील असून तेथून प्रकाश आत येणार आहे. पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील एक नवा प्रयोग असून लोकांसाठी तो लवकरच उपलब्ध होईल.