पार्थसारथी, तेविश विजेते
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शनिवारी येथे झालेल्या फिनेस्टा खुल्या राष्ट्रीय कनिष्ठांच्या टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत 16 वर्षांखालील वयोगटात मुलींच्या विभागात टॉपसिडेड पार्थसारथी मुंडेने तर मुलांच्या गटात तेविश पावा यांनी अजिंक्यपदे मिळविली.
16 वर्षांखालील मुलींच्या वयोगटातील झालेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात पार्थसारथीने श्रीनिती चौधरीचा 6-0, 3-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले. हा अंतिम सामना जवळपास दोन तास चालला होता. 16 वर्षांखालील मुलांच्या वयोगटातील एकेरीच्या अंतिम सामन्यात तेविश पावाने मनन अगरवालचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अजिंक्यपद मिळविले. या सामन्यात तेविशने बेसलाईन खेळावर अधिक भर दिला होता.
मुलींच्या 14 वर्षांखालील वयोगटातील एकेरीचे जेतेपद जेनसी कणबरने पटकाविताना अंतिम सामन्यात टॉपसिडेड पद्मप्रिया रमेशकुमारचा 6-2, 6-2 असा पराभव केला. तर मुलांच्या 14 वर्षांखालील वयोगटातील एकेरीच्या अंतिम सामन्यात हर्ष मारवाने विजेतेपद मिळविताना पाचव्या मानांकीत आरव मुळेचा 6-2, 6-2 असा पराभव केला. मुलांच्या 16 वर्षांखालील वयोगटात तेविश आणि प्रकाश सरन यांनी दुहेरीचे विजेतेपद मिळविताना अंतिम सामन्यात मनन अगरवाल व ओमप्रकाश पटेल यांचा 1-6, 7-5, 10-6 असा पराभव केला तर मुलींच्या 16 वर्षांखालील वयोगटातील दुहेरीचे जेतेपद पार्थसारथी आणि आकांक्षा घोष यांनी पटकाविताना अंतिम सामन्यात सन्मिता लोकेश व दीपशिखा यांचा 6-2, 7-6 (7-5) असा पराभव केला.