For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उड्डाण पुलाच्या स्पॅनचा भाग कोसळला

12:23 PM May 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
उड्डाण पुलाच्या स्पॅनचा भाग कोसळला
Advertisement

तीन कामगारांसह स्कूटरचालकही जखमी : गिरी येथील दुर्घटना,  वाहतूकही खोळंबली

Advertisement

पणजी : गिरी जंक्शन येथे बांधकामाधीन उड्डाण पुलाच्या स्पॅनचा भाग गर्डरवर उचलला जात असताना दीड मीटर उंचीवरून खाली कोसळला आणि चारजण जखमी झाले आहेत. जखमांपैकी तिघेजण उड्डाण पुलाचे काम करणारे कामगार तर चौथा स्कूटरचालक आहे. या दुर्घटनेमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले असून वाहतूकही सुरळीत करण्यात आली. उड्डाण पुलाच्या दोन खांबांमध्ये बसविण्यात येणाऱ्या काँक्रिटच्या भागाला स्पॅन म्हणतात. साधारणपणे 14 ते 17 भाग जोडल्यानंतर एक स्पॅन तयार होतो. या एका स्पॅनमधील एक भाग गर्डरवर उचलला जात असताना खाली कोसळला. वर उचलत असताना भागाला आधार देणारे धातूचे हुक निकामी झाल्याचे लक्षात येताच तो भाग पुन्हा खाली उतरविण्याचा प्रयत्न केला जात असताना दीड मीटर उंचीवरुन भाग कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

घटना घडल्यानंतर आपत्कालीन सेवा आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या ऊग्णालयात नेण्यात आले. अधिकाऱ्यांनी अद्याप हुक निकामी कसे झाले? स्पॅन कोसळण्याचे नेमके कारण काय? हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. एक स्कूटरचालक घटनास्थळाच्या बाजूला स्कूटर उभी करून उभा राहिला होता. स्पॅनचा भाग खाली कोसळला आणि ते काँक्रिट फुटून त्याचा एक तुकडा स्कूटरवाल्यावर पडल्याने तो जखमी झाला. स्पॅनचा भाग उचलला जात असताना त्याच्यावर तीन कामगार होते. स्पॅनचा भाग पडत असल्याचे एका कामगाराच्या लक्षात येताच त्याने खाली उडी मारली, त्यात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. दोघे कामगार किरकोळ जखमी झाले असून तिघांना उपचाराअंती घरी पाठवण्यात आले तर एक कामगार अद्याप इस्पितळात आहे.

Advertisement

काँग्रेसची टीका

उड्डाण पुलाच्या स्पॅनचा भाग कोसळणे ही सरकारच्या विकासकामांबाबतची गुणवत्ता दिसून आल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. आजच्या घटनेवरून हा उड्डाण पूल सुरक्षित असणार काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. जास्त कमिशनसाठी दर्जाबाबत केलेली ही तडजोड असल्याचेही पाटकर यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.