पाडलोसमध्ये कालव्याचा भाग खचतोय
नुकसान झाल्यास जबाबदार कोण ? संरक्षक भिंत बांधण्याची शेतकऱ्यांची मागणी
न्हावेली / वार्ताहर
मडुरा पाडलोस हद्दीवरील पाडलोस भागात असलेल्या तिलारी पाटबंधारे विभागाच्या कालव्याचा भाग खचू लागला आहे. कालव्यापासून शेतकऱ्यांची जमीन केवळ दोन ते तीन मीटर अंतरावर असल्याने शेतकऱ्यांची जमीन कालव्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकसान होण्यापूर्वीच पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधण्याची मागणी, पाडलोस येथील काजू बागायतदार शेतकरी सुधीर गावडे यांनी केली आहे. दमदार कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले. काही ठिकाणी तर रस्त्याच्या बाजूलाच मोठमोठाली भगदाडे पडली. तर पाडलोस व मडुरा सीमाभागात असलेल्या तिलारी पाटबंधारे कालव्याचे पात्र दिवसेंदिवस रुंदावत चालले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे तीन ते चार मीटर जमीन कालव्यात कोसळली. कालव्यापासून शेतकऱ्यांची जमीन दोन ते तीन मीटर अंतरावर असल्याने भविष्यात काजू बागायती कालव्यात कोसळू शकतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कालव्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी बागायतदार सुधीर गावडे यांनी केली आहे.
पुढे काय होणार?
बागायतीपासून सुमारे दोन मीटर अंतरावर कालवा खचत असल्याने मेहनत करून लागवड केलेल्या काजू कलमांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संपूर्ण पावसाळा अजून बाकी असल्यामुळे अजून किती जमीन खचणार अशी भीती शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. तसेच नुकसान झाल्यास बागायतीचे पुढे काय असा सवाल सुधीर गावडे यांनी केला आहे.