For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगावात आणखी एका जीर्ण इमारतीचा भाग कोसळला

12:15 PM May 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
मडगावात आणखी एका जीर्ण इमारतीचा भाग कोसळला
Advertisement

सिने लतानजीक पहाटेच्या वेळेस घडलेली घटना, सुदैवाने हानी टळली, मडगाव पालिकेने जीर्ण इमारतींची फेरतपासणी करण्याची मागणी

Advertisement

मडगाव : मडगावातील जीर्ण इमारतींचे काँक्रिटचे भाग कोसळून पडण्याच्या घटना सुरूच असून शुक्रवारी दुपारी पिंपळकट्ट्यानजीक घडलेल्या घटनेनंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास सिने लतानजीकच्या एका जीर्ण इमारतीचा भाग कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी वा मालमत्तेची हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मडगावातील जीर्ण इमारतींचे भाग खास करून गॅलरीचे भाग कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने लोक भयभीत झाले असून अशा प्रकारच्या जुन्या जीर्ण इमारतींच्या नजीक फिरणे ते टाळत असल्याचे दिसून येत आहे.

मडगाव पालिकेने 21 जीर्ण आणि धोकादायक इमारतीची यादी तयार केलेली आहे. त्यात ही इमारत समाविष्ट नसल्याचे दिसून येते. होली फॅमिली असे या इमारतीचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. जीर्ण आणि धोकादायक इमारतींच्या यादीत असलेल्या इमारतींच्या व्यतिरिक्त अन्य इमारतींच्या भागांची पडझड होऊ लागल्याने मडगाव पालिकेने आपल्या क्षेत्रातील अन्य जीर्ण होत असलेल्या इमारतींची फेरतपासणी करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. देव दामबाब आम्हाला पावला आणि 24 तासांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या इमारतींचे सज्जा कोसळण्याच्या घटनांत फारशी हानी झाली नाही. परंतु पालिका आणि प्रशासन किती काळ असा ‘राम भरोसे’ कारभार हाताळणार, असा सवाल मडगावासियांकडून उपस्थित केला जात आहे.

Advertisement

मडगाव पालिकेने नोंद केलेल्या 21 धोकादायक इमारती

मडगाव पालिकेने जीर्ण आणि धोकादायक इमारती म्हणून नोंद केलेल्या 21 इमारतींची यादी मुख्याधिकारी मेल्विन वाझ यांनी मामलेदार कार्यालयाला नुकतीच सादर केली आहे. त्यात लोटलीकर इमारत मडगाव उ•ाणपुलाजवळ, सुकडो इमारत सिने लतासमोर, मारशॉन इमारत लोहिया मैदानसमोर, सबिना हॉटेल मडगाव बस स्टँडजवळ, तिळवे इमारत डेव्हिड अँड कंपनी नजीक, दि द गोल्डन फोटो स्टुडिओ इमारत, ग्रासियस फुर्तादो इमारत खारेबंद, प्रीडिओ कार्दोज इमारत खारेबांद, व्हिला कुतिन्हो खारेबांद, पेद्रू आवेलिनो लुईस इमारत न्यू इरा शाळेच्या मागे, न्यू इरा शाळेची इमारत मालभाट, परशुराम रायकर आणि लाडू रायकर इमारत चिंचाळ रेल्वे फाटकाजवळ, च्युरी बिल्डिंग ग्रेस चर्चच्या मागे, गुरू आशिष बिल्डिंग, रिजेंट चेंबर इमारत गांधी मार्केट, स्टड अॅसेसरीज दुकान-इमारत रेमंड शोरूमजवळ, क्रूझ मॅन्शन बिल्डिंग मडगाव लोहिया मैदानानजीक, डायस बिल्डिंग पिंपळकट्ट्यानजीक. पेद्रिन्हो बिल्डिंग मडगाव कॅफेजवळ, दाऊद बिल्डिंग खारेबांद, कासा मिनेझिस इमारत (रॉयल लॉज) गांधी मार्केट नजीक या इमारतींचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.