Parshuram Ghat Konkan : सावधान! परशुराम घाटातील गॅबियन वॉल घसरण्यास सुरुवात
संरक्षणासाठी केलेली उपाययोजनाच ढासळत असल्याने भीती वाढली
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडींपासून सुरक्षितता उपायोजना दृष्टीने करोडो रुपये खर्च करून लोखंडी जाळी व गॅबियन वॉल उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र यातील गॅबियन वॉल घसरण्यास सुरूवात झाली आहे. अवकाळी पावसाने कामाचा दर्जा उघड केला असून यामुळे भीती निर्माण झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला 22 मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडीच्या ठिकाणी गेल्या महिन्यांपासून लोखंडी जाळी बसवली जात आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
तर दुसरीकडे गतवर्षीच्या पावसात कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी येथे पाऊस मुसळधार पडल्याने ही कामे थांबली होती. मात्र आता पावसाने व़िश्रांती घेतली असल्याने पुन्हा या कामाने वेग घेतला आहे. असे असताना मंगळवारी गॅबियन वॉल घसरत असल्याचे समोर आले आहे.
यामुळे परशुराम घाटातील निकृष्ट कामाचा नमुना पुन्हा समोर आल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकारामुळे घाटातील प्रवास धोकादायक बनत असल्याने भीती निर्माण झाली असून सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.