पर्राकरांनी बहुजनातील युवकांना घडविले राजकारणी!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केल्या भावना : विचार, कार्यपद्धतीवर टाकला ममत्वाचा प्रकाशझोत
पणजी : मनोहर पर्रीकर हे भावलेले नेतृत्व गोव्यालाच नव्हे तर संरक्षणमंत्री या नात्याने संपूर्ण देशाला मिळाले. स्वत:मधील कर्तव्य भावनेतून त्यांनी झपाट्याने जी काही विकासकामे हाती घेतली आणि राजकारणात स्वच्छता आणली, त्या त्यांच्या कर्तृत्वाने भारावून जाऊन माझ्यासारखे अनेक युवा कार्यकर्ते राजकारणात उतरले. आजही पर्रीकरांची प्रेरणा आम्हाला विकासकामे करण्यास आणि सातत्याने सेवा बजावण्यास प्रोत्साहन देते... मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे हे भावोद्गार! स्व. मनोहर पर्रीकर यांची आज जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल गुरुवारी आपल्या त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
भविष्याची चिंता करु नकोस
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, मनोहर पर्रीकर हे माझ्यासाठीच नव्हे तर गोव्यातील तमाम युवकांसाठी एक भावलेले नेतृत्व होते. आपण राजकारणात उतरण्याचा जेव्हा विचार देखील फारसा केला नव्हता, त्यावेळी मनोहर पर्रीकर यांची कार्य करण्याची पद्धत आणि त्यांच्यातील जिद्द, धडाडी पाहून आमच्यामध्येही उत्साह निर्माण झाला. त्यांनी मला सरकारी नोकरी सोडून राजकारणात येण्याचा सल्ला दिला. भविष्याची चिंता करू नकोस, पुढे जा. तुझ्यासारख्या युवकांना उज्ज्वल भवितव्य आहे. हे त्यांचे सांगणे होते.
पर्रीकरांनी बहुजन समाजातून घडविले नेते
पर्रीकरांच्या आग्रहाखातर आपण सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला. पर्रीकरांचे एकंदरीत राजकारण पहा. त्यांनी गोव्यातील अत्यंत गरिब, कष्टकरी, दुर्लक्षित घटक आणि तमाम बहुजन समाजातील युवाशक्तीला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्यामधून नेतृत्व घडविले. ज्यांची आर्थिक क्षमतादेखील अत्यंत कमकुवत अशी होती, अशा युवावर्गाला त्यांनी राजकारणात आणले आणि त्यांना नेते बनविले, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
पर्रीकरांमुळेच खरा विकास झाला
दूरदृष्टी असलेला एक लढवय्या राजकारणी म्हणून पर्रीकर जास्त भावले. अनेकांनी विकासाचे ढोल बडवले असतील, परंतु खऱ्या अर्थाने गोव्याचा विकास हा पर्रीकरांच्या कारकिर्दीपासूनच सुरू झाला. आज आपल्याला गोव्यात जे अनेक प्रकल्प दिसतात ते पर्रीकर यांच्यामुळेच दिसतात. त्यांना आधुनिक गोव्याचा शिल्पकार असे म्हटले तरी ते मुळीच चुकीचे होणार नाही. हजारो युवाशक्तीला प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्यामध्ये देशभावना जागृत करण्याची अफाट शक्ती या नेत्यांमध्ये होती. म्हणूनच गोव्यात भाजपला पुढे चांगली सुवर्णसंधी प्राप्त झाली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जनतेपोटी प्रेमभावना जपली
सामाजिक क्षेत्रात मनोहर पर्रीकर यांनी दिलेले योगदान हे फार मोठे आहे. गोव्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे खरे श्रेय हे पर्रीकरांनाच जाते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केवळ ते काम करूनच राहिले नाहीत तर जनतेपोटी आपुलकी, प्रेमभावना ठेवली. हे करीत असताना कर्तव्याला सर्वश्रेष्ठ मानत राहिले.
त्यांच्या भाषणांमुळे चैतन्यनिर्मिती
राज्य विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते असताना त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण तसेच घणाघाती भाषणे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणे कधीही विसरता येणार नाही. आपल्या भाषणांतून त्यांनी अनेक युवकांमध्ये चैतन्य निर्माण केले. माझ्यासारखे अनेक बहुजन समाजातील युवक हे प्रत्यक्ष राजकारणात उतरले आणि त्यांच्यामुळेच, त्यांच्या प्रेरणामुळेच विधानसभेत देखील पोहोचले. सभापती रमेश तवडकर असो, विनय तेंडुलकर, गणेश गावकर, नीलेश काब्राल, सुभाष फळदेसाई, राजेश पाटणेकर असे अनेक युवक हे भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले. आपल्याला आजही आनंद आहे की पर्रीकरांचे बोट धरून आपण राजकारणात आलो. तिथून विधानसभेत पोहोचलो आणि आज मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलो. ते आमचे आदराचे स्थान, मानाचे स्थान आणि प्रेरणास्थान. आज अनेक जण आपण समाजसेवा करतो असे दाखवून राजकारणात उतरतात. पर्रीकरांचे तसे नव्हते. त्यांनी प्रत्यक्ष अफाट कष्ट घेतले. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले. त्यांचे प्रश्न हाती घेतले, ते सोडविण्याचे प्रयत्न केले आणि त्यातून पुढे राजकारणात उतरले.
संरक्षणमंत्री म्हणून केलेले कार्य प्रेरणादायी
मनोहर पर्रीकर यांना गोव्याचा युगपुऊष म्हटले तरी नवल वाटू नये. त्यांचे कार्य त्यांची प्रेरणा आमच्यासाठी आजही अभिमान आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गोव्यात केलेले कार्य हे फार मोठे कार्य आहे. याशिवाय या देशाचे संरक्षणमंत्रीपद सांभाळताना त्यांनी दोन वेळा केलेले सर्जिकल स्ट्राईक तसेच राफेल विमान खरेदीचा केलेला करार त्यामध्ये देखील बाळगण्यात आलेली पारदर्शकता आणि सैनिकांच्या एकंदरीत जीवनाचा विचार करून ‘वन रँक वन पेंशन’ योजना सुरू करून अनेक वर्षांचा त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला. संरक्षणमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांचे कार्य अल्पावधीत सर्वांनाच प्रेरणा देऊन गेले... मुख्यमंत्री अभिमानाने सांगत होते.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मनोहर पर्रीकर यांना नेहमीच आपले आदर्श, गुऊ मानतात. पर्रीकरांकडे पाहताना त्यांचे टार्गेट असलेला युवावर्ग याची याद सदोदित येत राहते आणि मग डॉ. सावंत हे देखील युवावर्गाला सल्ला देतात. पर्रीकरांवर आपली प्रतिक्रिया व आपले विचार मांडताना मुख्यमंत्री म्हणाले की, आजही युवा वर्गाने राजकारणात प्रवेश करावा. आम्हाला नवीन नवीन युवक राजकारणात आलेले पाहिजे आहेत. समाजासाठी त्यांनी वावरले पाहिजे. अथक परिश्रम घेतले पाहिजे. देशसेवा, समाजसेवा यामध्ये जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्यातूनच राजकारणात प्रवेश निश्चितच मिळेल आणि हे सर्व काम करताना युवकांनी आपण करीत असलेल्या कामावर श्रद्धा ठेवावी. देशसेवा हे प्रथम कर्तव्य हे जाणूनच सद्विचाराने पुढे जावे. त्यातूनच खऱ्या अर्थाने आपण सर्वजण पर्रीकरांना श्रद्धांजली देऊ शकतो.