For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिटनमध्ये 4 जुलैला संसदेची निवडणूक

06:58 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रिटनमध्ये 4 जुलैला संसदेची निवडणूक
Advertisement

वृत्तसंस्था / लंडन

Advertisement

ब्रिटनमध्ये 4 जुलैला तेथील संसदेची निवडणूक होत आहे. त्या देशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ही घोषणा केली. पूर्वनिर्धारित कालावधीपेक्षा ही निवडणूक लवकर होत असल्याने ती मध्यावधी निवडणूक म्हणून ओळखली जात आहे. या निवडणुकीत सध्या सत्ताधारी असलेल्या हुजूर पक्षाचा धुव्वा उडणार आहे, असा निष्कर्ष अनेक सर्वेक्षण संस्थानी काढला आहे. मजूर पक्षाला दोन तृतियांश बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या संसदेत 650 जागा आहेत.

स्वत: पंतप्रधान सुनक आपल्या मतदारसंघातून पराभूत होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ते अशी स्थिती झालेले प्रथम पंतप्रधान होतील असे बोलले जात आहे. आतापर्यंत सात विविध संस्थांनी सर्वेक्षणे केली आहेत. सर्वांचा निष्कर्ष हुजूर पक्ष पराभूत होणार असाच आहे. हुजूर पक्षाला 650 पैकी केवळ 65 ते 117 जागा मिळतील असे अनुमान आहे. मजूर पक्षाला 450 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्षाचे नेते कीर स्टार्मर हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी आरुढ होतील, असा सर्व सर्वेक्षण संस्थांचे अनुमान आहे.

Advertisement

सुनक यांच्यावर आरोप

पराभव झाल्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटन सोडून अमेरिकेला स्थायिक होतील, असा आरोप त्यांच्याच पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे माजी मंत्री लॉर्ड गोल्डस्मिथ यांनी केला होता. मात्र, हुजूर पक्ष आणि सुनक यांनी या आरोपाचा इन्कार केला असून आपण ब्रिटनमध्येच राहणार असून परिस्थितीशी दोन हात करणार आहोत, अशी प्रतिक्रिया या आरोपावर सुनक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

भारताशी संबंध सुधारणार

मजूर पक्षाचा विजय होऊन स्टार्मर यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर भारताशी संबंध सुधारले जातील. तसेच, भारताशी मुक्त व्यापार करार करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल. मजूर पक्षाचा विजय झाल्यास डेव्हिड लॅमी यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी भारताशी संबंध सुधारण्याची घोषणा इंडिया ग्लोबल फोरमच्या कार्यक्रमात केली आहे.

दोन्ही पक्षांची वचनपत्रे प्रसिद्ध

हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष या दोन्ही पक्षांनी त्यांची वचनपत्रे प्रसिद्ध केली आहेत. हुजूर पक्ष स्थलांतरीतांची संख्या मर्यादित राखण्यावर भर देत आहे. तसेच ब्रेक्झिटनंतर युरोपशी संबंध बळकट करण्यावर भर देणार आहे. देशाची संरक्षण तरतूद वाढविली जाणार असून ती स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2.5 टक्के केली जाईल. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत 92 हजार परिचारिका आणि 28 हजार डॉक्टरांची भर्ती केली जाईल, अशी आश्वासने या पक्षाने दिली आहेत.

तंत्रज्ञांचे स्वागत करणार

मजूर पक्षाने शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी आणि कुशल तंत्रज्ञ यांचे ब्रिटनमध्ये स्वागत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. रोजगार वाढविण्यासाठी नवे औद्योगिक धोरण, शरणार्थींना परत पाठविण्याचे धोरण रद्द करणार, कर वाढविण्याऐवजी संपत्तीच्या निर्माणावर भर देण्यात येणार, अवैध स्थलांतरितांना रोखण्यासाठी कायदे कठोर करणार, युरोपशी संबंध सुधारणार, अशी अनेक आश्वासने दिली आहेत.

Advertisement
Tags :

.