महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संसदेला यलो अलर्ट!

06:30 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताच्या नव्या लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन युवकांनी प्रेक्षागृहातून उड्या टाकून पिवळ्या धुराच्या नळकांड्या फोडल्या. संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण झाली आणि त्यादिवशी संसदेच्या सुरक्षेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले, नेमके त्याच दिवशी हा प्रकार घडल्याने भारताची नाचक्की आणि हुतात्म्यांची अवहेलना झाली आहे. खरेतर आतापर्यंत पुढे आलेल्या माहितीनुसार संसदेत गोंधळ माजवलेल्या आणि बाहेर राहून घोषणाबाजी केलेल्या युवकांनी केलेल्या कृत्याने खासदारांना इजा पोहोचलेली नसली तरी त्यांच्या कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही. या युवकांना देशातील बेरोजगारी, हुकूमशाही कारभाराकडे लक्ष वेधून निषेध करायचा होता. म्हणून त्यांनी हे कृत्य केले आहे, असे सांगितले जात असले तरीही त्याचे समर्थन होऊ शकत नाही. पण, या घटनेने नव्या संसदभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्यंत कठोर तपासणीतून आणि स्कॅनरमधून जाऊनसुध्दा धुराचे कॅन लोकसभेत घेऊन जाण्यात हे युवक यशस्वी झाले हे मान्य करणेही धोकादायक आहे. भारतीय यंत्रणेचा फोलपणा यातून केवळ उघडा पडत नाही तर आपल्या खासदारांसह संसद भवनातील प्रत्येक व्यक्ती आजही असुरक्षित आहे यावरच शिक्कामोर्तब होते. 22 वर्षापूर्वी संसदेवर झालेल्या हल्ल्याला कितीही विसरायचे म्हंटले तरी विसरता येत नाही. तो दहशतवादी हल्ला होता आणि बुधवारी झालेली घटना आतापर्यंत तरी घुसखोरीत गणली गेली आहे. पण, देशाचे गृहमंत्री यांनी याप्रकरणी राजीनामा द्यावा म्हणून विरोधकांना गुरुवारी गोंधळ घालण्याची संधी मिळाली. त्याप्रकरणी सरकारने 15 खासदारांना निलंबित करुन आपणही कडक शिस्तप्रिय असल्याचे भासवले. हे सत्य लपून राहत नाही की, काही दहशवाद्यांनी संसदेवर याचदिवशी हल्ला करू अशी धमकी दिलेली असतानाही यंत्रणा निष्काळजीपणे वागल्या. त्याचे जे चित्र जगासमोर गेले ते खूपच वाईट होते. आता हा विषय बेरोजगारीची समस्या मांडणारा, शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे ठेवणारा, देशात हुकूमशाही येत असून त्याला विरोध म्हणून होता असे वातावरण केले जात आहे. हा प्रकार घडवणारे युवक शहीद ए आझम भगतसिंग यांचे चाहते आहेत आणि त्यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या एका समाज माध्यमावरील ग्रुपचे सदस्य आहेत, देशाच्या वेगवेगळ्या भागातून ते दिल्लीत एकत्र जमले आणि त्यांनी हे कृत्य करून देशापुढील प्रश्न भगत सिंग यांच्या मार्गाने मांडले असे लोकशाही राज्यात त्याचे समर्थन होऊ शकत नाही. पण, ज्या खासदारांनी संसदेत उडी ठोकलेल्या दोन्ही युवकांना पकडल्यानंतर चोप दिला तेही त्यांच्या पदाच्या थोरवीला शोभणारे नाही. कायदे करायला संसदेत आलेल्यांनी या युवकांना पकडल्यानंतर मार्शलच्या हवाली करणे योग्य होते. त्याऐवजी त्यांनीच आधी चोप देण्यास सुरुवात केली. हे त्यांनी किंवा त्यांच्या पूर्वसुरीनी बनविलेल्या कायद्यात बसते का? सागर शर्मा आणि मनोरंजन डी. या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून मुख्य सभागृहात उड्या घेतल्या. ‘तानाशाही नहीं चलेगी’ अशा घोषणा देत त्यांनी पिवळा धूर सोडणाऱ्या नळकांड्या फेकल्या. त्यामुळे सभागृह धुराने भरून गेले. त्यामुळे पुढे काय होईल या भीतीपोटी खासदारांनी ही स्वरक्षणार्थ कृती केली असे जनतेने आपल्या भाबड्या मनाला समजावून सांगायचे. नेमकी ही उडी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या बाजूला पडली. देशातील युवक अस्वस्थ होऊन अशी कृती करत असताना त्यांचे प्रश्न मांडण्यात विरोधी पक्ष कुठेतरी कमी पडतोय आणि त्यामुळे त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास कमी झालेला आहे, ज्याचे प्रतिबिंब त्यांची खासदार संख्या कमी होण्यात उमटत आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपला राज्याराज्यांमध्ये सुध्दा भरभरून प्रतिसाद मिळत असताना चार राज्यातील युवक अशी कृती करून आपले प्रश्न मांडत असतील तर हे त्यांच्या लोकप्रियतेलाही दुषणच आहे. हे युवक डाव्या विचार सरणीचे असल्याने त्यांनी अशी कृती केली म्हणावे तर त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी किंवा एकसारखी नाही. पालकांनीही त्यांचे समर्थन केलेले नाही. या युवकापैकी एकाला पोलीस किंवा लष्करात भरती व्हायचे होते आणि दिल्लीला भरतीसाठी जात असल्याचे त्याने घरात सांगितले होते. एक युवक संगणक अभियंता तर युवती एम फिल केलेली आहे. पण, अपेक्षाभंग झालेली युवा पिढी जशी कृती करेल तसे त्यांनी केले असे सहजासहजी म्हणता येत नाही. तशी कृती परक्या सत्तेविरूद्ध करणे आणि आपणच निवडून देत असलेल्यांविरुध्द करणे यात खूप अंतर आहे. ज्याचे विश्लेषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी केले होते. अर्थात अद्याप तपासात त्यांचा मूळ हेतू किंवा त्यांचे संबंध कोणत्या दहशतवादी समूहाशी आहेत का? हे स्पष्ट झालेले नाही. मात्र सरकारने त्यांच्यावर कलम तरी तसेच लावले आहे. तपासात जी माहिती पुढे येईल ती सत्यनिष्ठ असावी अशी देशातील जनतेचीही अपेक्षा असणार आहे. समाज माध्यमांवरून तरुणांची डोकी भडकवण्याचे अनेक प्रयोग होतात. एका बाजूला झटकाविरुद्ध हलाल, हिंदू मुस्लिम, दुसऱ्या बाजूला दलित आणि अल्पसंख्य, कनिष्ठ वर्गाचा छळ अशा विषयावर रोज होणारे हजारो ट्विटर स्पेस तरुणांची माथी भडकवत आहेत. यात सत्ता आणि विरोधी दोन्ही बाजूचे लोक आहेत. त्यामुळे असे प्रकार दोन्ही बाजूचे माथे भडकलेले युवक करू शकतात. त्यांना या कृत्यापासून दूर करून लोकशाही प्रक्रियेत आणायचे तर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांचे वर्तनही तितकेच लोकशाहीवादी हवे आणि सर्वच राजकीय पक्षसुद्धा कसे वागतात हे त्यांच्या कृतीतून दिसले पाहिजे. त्यामुळे लोकशाहीच्या मंदिरावर हल्ला झाला असे पोकळ दु:ख व्यक्त न करता लोकशाहीच्या मंदिराचे पावित्र्य त्यांनी कृतीतून जपले पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात सरकारने योग्य तपास करणे आवश्यक आहे. अफजल गुरूच्या समर्थनार्थही काही लोक उभे राहतात जे पूर्णत: चुकीचे आहे. पण, या युवकांच्या बाबतीत तसे नाही. त्यांच्या कृतीत अतिरेक आहे, पण त्यांनी शस्त्र उचललेले नाही. धूर झाला हा ‘यलो अलर्ट’ जरूर आहे! पण तो तपास यंत्रणेला कमी आणि देशाच्या सत्ताधारी आणि विरोधी धोरणकर्त्यांना अधिक आहे!

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article