संसदेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
सुरक्षा मुद्द्यावर विरोधकांचा गदारोळ : सोनियांनी घेतली 14 निलंबित खासदारांची भेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी शुक्रवार, 15 डिसेंबरला संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरून दोन्ही सभागृहात कामकाज ठप्प झाले. लोकसभा आणि राज्यसभेत सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी गदारोळ केला. विरोधकांनी सभागृहात गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सकाळी 11 वाजता दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाले. सभापती ओम बिर्ला खुर्चीवर बसताच गदारोळ सुरू झाला. विरोधी खासदार वेलमध्ये पोहोचले. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज सकाळी 11.02 वाजता आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. 2 वाजता दोन्ही सभागृहात कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा गदारोळ झाल्यानंतर सोमवार, 18 डिसेंबरपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी, लोकसभेतील 13 आणि राज्यसभेतील एक अशा एकंदर 14 निलंबित खासदारांनी शुक्रवारी गांधी पुतळ्यासमोर सभागृहाबाहेर निदर्शने केली. दोन्ही सभागृहात विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचे ते म्हणाले. सोनिया गांधी यांनी या खासदारांची भेट घेतली.
संसदेच्या सुरक्षेबाबत गुरुवारी 14 डिसेंबर रोजी दिवसभर सभागृहात गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेतील 14 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. काँग्रेसचे 9, माकप 2, डीएमके आणि सीपीआयचे प्रत्येकी एक असे एकूण 13 लोकसभा खासदार निलंबित झाले आहेत. तसेच तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.