संसदेचे कामकाज 2 डिसेंबरपर्यंत तहकूब
चार दिवसात केवळ 40 मिनिटेच कामकाज : विरोधकांनी अदानी आणि ‘संभल’वरून सरकारला धरले धारेवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून सुरू झाले. गेल्या 4 दिवसात सभागृहाचे कामकाज केवळ 40 मिनिटे चालले. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात दररोज सरासरी 10-10 मिनिटे कामकाज झाले. विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत अदानींवरील आरोप आणि उत्तर प्रदेशमधील संभल येथे झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत कामकाजादरम्यान गोंधळ सुरूच ठेवला. विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न सभापतींनी अनेकदा करूनही विरोधक शांत झालेले नाहीत.
शुक्रवारीही सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी अदानी मुद्यावर चर्चेची आणि चौकशीची मागणी करत सभागृहात गोंधळ घातला. यावर सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सर्व सदस्यांनी सभागृहाचे कामकाज चालू द्यावे. देशातील जनता संसदेबाबत चिंता व्यक्त करत आहे. सभागृह सर्वांचे असून देशाला संसद चालवायची आहे, असे आवाहन केले. तसेच राज्यसभेतही सलग चौथ्या दिवशी विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. या गोंधळपूर्ण वातावरणामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सोमवार, 2 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
अदानी यांच्यावर अमेरिकेत 2 हजार कोटींची लाच दिल्याचा आरोप आहे, असे राहुल गांधी बुधवारी संसदेबाहेर म्हणाले होते. त्यांना तुरुंगात डांबण्याची आवश्यकता असताना मोदी सरकार त्यांना वाचवत आहे, असेही ते म्हणाले होते. अजूनही काँग्रेस अदानी मुद्यावर चर्चेच्या मागणीवर ठाम आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब केल्यावर काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी याबाबत आपले मत नोंदवले. ‘मला आशा आहे की सरकार मोठे मन दाखवेल आणि विरोधकांना महत्त्वाचे मुद्दे मांडण्याची संधी देईल. सरकारने असा मार्ग शोधला पाहिजे की ज्याद्वारे विरोधी पक्ष आपले मत मांडू शकतील आणि सरकार आपले मत मांडू शकेल,’ असे काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले.
विरोधकांकडून घोषणाबाजी अयोग्य : धनखड
राज्यसभेत विरोधी खासदारांच्या सततच्या घोषणांदरम्यान सभापती जगदीप धनखड यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ‘सभागृहात विरोधकांनी चालवलेला गोंधळ समर्थनीय ठरू शकत नाही. या गदारोळामुळे आपण देशवासियांसमोर खूप वाईट उदाहरण मांडत आहोत. आमचे काम लोककेंद्रित नाही. आपण चुकीच्या मार्गाने वाटचाल करत आहोत’, अशी टिप्पणी धनखड यांनी केली आहे. यानंतर राज्यसभेचे कामकाज 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.