मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स
गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी बैठक : अजित दादाकडे उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ तर शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदासह नगरविकास व पीडब्ल्यूडी खाते मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी बुधवारी रात्री उशिरा चर्चा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास राज्यातील राजकारणाची दिशा काय असेल, त्याचा राज्यात काय संदेश जाईल याची तसेच दुसरीकडे बिगर मराठा चेहरा दिल्यास त्याचे काय पडसाद उमटतील याची पण चर्चा झाल्याचे समजते. यामुळे भाजप पुन्हा एकदा अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपदाचा नवा चेहरा देत धक्कातंत्र देणार का? असे तर्कवितर्क राज्याच्या राजकारणात लावले जात असून मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. गुरुवारी रात्री दिल्लीत झालेल्या महायुती व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबतचा निर्णय अद्याप झाला नाही.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून एक पाऊल मागे घेत सर्वाधिकार मोदी-शहांना सोपवले. त्यानंतर मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे स्पष्ट झाले. दिल्लीत गुरुवारी रात्री अमित शहा यांच्या घरी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स कायम राहिला. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपद तसेच उपमुख्यमंत्रिपद आणि इतर महत्त्वाच्या खात्यांबाबत चर्चा झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला मुख्यमंत्रिपद आणि गृहखाते मिळणार आहे, तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह नगरविकास आणि पीडब्ल्यूडी खाते मिळेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थखाते आणि उपमुख्यमंत्रिपद मिळेल. याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रातही एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये भाजप महाराष्ट्रातला त्यांचा गटनेता निवडणार आहे. यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत.
भाजपने गटनेता निवडल्यानंतर 1 डिसेंबरला महायुतीची बैठक मुंबईमध्ये पार पडेल, यानंतर 2 डिसेंबरला शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. एकट्या भाजपला 132 तर शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला. या बैठकीमध्ये भाजपकडे मुख्यमंत्रिपद आणि गृहखातं राहणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे नगरविकास आणि पीडब्ल्यूडी खातं मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांना अर्थखातं आणि उपमुख्यमंत्रिपद मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रात्री 12 नंतर बैठक संपुष्ठात
केंद्रीय मंत्री आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही या बैठकीस उपस्थित होती. रात्री 12 च्या सुमारास ही बैठक संपुष्टात येऊन आधी नड्डा रवाना झाले आणि नंतर फडणवीस, शिंदे व पवार रवाना झाले. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा मानकरी कोण ते ठरणार अशी अटकळ होती. परंतु तसे घडलेले नसून आता दोन दिवसांनी पक्षाचे निरीक्षक मुंबईत येऊन चर्चा करणार अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 2 डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होऊ शकते, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते उदय सामंत आणि शंभुराज देसाई यांच्यासह एकनाथ शिंदे राजधानीत पोहोचले. तत्पूर्वी, फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार यांची भेट घेतली. महायुतीच्या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांची दिल्लीत स्वतंत्रपणे भेट घेतली. मुंबईहून आलेले शिवसेना नेते थेट शहा यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी पोहोचले, तिथे भाजपचे अध्यक्ष नड्डा आधीच उपस्थित होते.