शहापुरात पार्किंग व्यवस्थेचे तीनतेरा
सातत्याने वाहतूक कोंडी : पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर आणि उपनगरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा उडालेले असतानाच पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर वाहनचालक मनमानी पद्धतीने डबल पार्किंग करत आहेत. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
दिवसेंदिवस वाहनांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मात्र, शहरातील पार्किंगची ठिकाणे अपुरी पडत आहेत. वाहनांच्या संख्येच्या तुलनेत नवीन वाहनतळ सुरू करणे अत्यंत जरुरीचे आहे. याबाबत वाहतूक पोलिसांकडून महापालिकेकडे पाठपुरावा केला जात असला तरी महापालिकेकडून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने ही समस्या आणखी जटील बनत चालली आहे. शहराबरोबरच आता शहापूर परिसरातील पार्किंगचा प्रश्न डोकेदुखी बनत चालला आहे. कपिलेश्वर ओव्हरब्रिज ते शहापूर बँक ऑफ इंडियापर्यंतच्या रस्त्यावर वाहनचालक मनमानी पद्धतीने डबल पार्किंग करत आहेत. हा रस्ता आधीच अरुंद आहे. त्यातच डबल पार्किंग केले जात असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासह संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.