जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पार्किंग हटविले
बेळगाव : बेळगाव ट्रॅफिक पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणारी पार्किंग हटविण्यात आली. या परिसरात विविध सरकारी कार्यालये, न्यायालये आहेत. यामुळे याठिकाणी नागरिकांची कायम गर्दी असते. मात्र नागरिक या परिसरात अवाढव्यपणे आपल्या गाड्या पार्क करून कामासाठी जातात. यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मार्गक्रमण करताना समस्या उद्भवत होत्या. याची दखल घेऊन ट्रॅफिक पोलीस विभागाने एएसआय बी. बी. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सदर पार्किंग हटवून रस्ता मोकळा करून दिला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात न्यायालय, उपनोंदणी कार्यालय, ता. पं., जि. पं. सह विविध कार्यालये आहेत. यामुळे शेकडो नागरिक आपल्या समस्या घेऊन याठिकाणी येत असतात. पण नागरिक जागा मिळेल त्याठिकाणी गाड्या पार्क करून आपल्या कामासाठी जातात. यामुळे रस्ता अरुंद झाल्याने मार्गक्रमण करताना अनेक अडचणी येतात. परिणामी ट्रॅफिक जामची परिस्थिती उद्भवते. यामुळे ट्रॅफिक पोलिसांकडून अवाढव्य असलेली पार्किंग हटवून नागरिकांना सोईस्कर करून दिले.