पार्किंग एका जागेवर दंड मात्र दुसऱ्या जागेच्या नावाने
वाहतूक पोलिसांचा अजब कारभार
बेळगाव : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र, ही कारवाई करताना काहीवेळा वाहतूक पोलीस यंत्रणा भरकटलेली दिसते. जिल्हा पंचायत कार्यालयाजवळ कार उभी केलेल्या कारमालकाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार लावून नियम मोडल्याचे सांगत नोटीस देण्यात आली आहे. दंड भरण्यासाठी ऑटोमेशन सेंटरकडून दिलेल्या नोटिसीत कारचा फोटोही जोडण्यात आला आहे. कार जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी जि. पं. जवळ उभी असल्याचे स्पष्टपणे दिसते. 15 जुलै रोजी जिल्हा पंचायत कार्यालयाजवळ उभ्या करण्यात आलेल्या कारचा वाहतूक पोलिसांनी फोटो घेतला आहे. तरीही दंड वसूल करताना मात्र कार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कारमालक कृष्णा पंडित यांना नोटीस पाठविण्यात आली असून बुधवार दि. 31 जुलै रोजी त्यांनी दंड भरला असला तरी दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियम मोडल्याचा ठपका ठेवत नोटीस पाठविताना अशा अनेक चुका घडत आहेत.