वर्दळीच्या रस्त्यांवर चारचाकी वाहनांचे पार्किंग
शहरातील वाहतूक समस्या गंभीर : वाहतूक पोलीस-महापालिकेचे दुर्लक्ष : दंडात्मक कारवाईची गरज
बेळगाव : शहरातील पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात पार्किंगच्या सुविधा उपलब्ध नसल्याने जागा मिळेल तेथे पार्किंग केले जात आहे. विशेष म्हणजे वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर पार्किंग होत असल्याने वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत असून पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. किल्ला तलावापासून रेल्वेस्टेशनजवळील गोगटे सर्कलपर्यंत मुख्य रस्त्यावर मोठी वर्दळ असते. शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे मुख्य रस्त्यावर पार्किंग होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. परंतु, सध्या कॉलेज रोड, क्लब रोड, सिव्हिल हॉस्पिटल रोड, संगोळ्ळी रायण्णा रोडवर सर्रास पार्किंग केले जात आहे. नो पार्किंगचे फलक असतानाही बिनधोकपणे चारचाकी वाहनांचे पार्किंग होत असल्याने शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. शहरातील न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दररोज वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. उपनोंदणी कार्यालयासमोर खुल्या जागेत वाहने पार्किंग करण्यास जागा उपलब्ध करूनही रस्त्यावर पार्किंग केले जात असल्याने वारंवार कोंडी होत आहे. संगोळ्ळी रायण्णा रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पार्किंग करण्यात येत असल्यामुळे याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे.
मनपाची कारवाई थांबली...
प्रत्येक अपार्टमेंट व आस्थापनांना तळमजल्यात वाहन पार्किंगसाठी जागा राखीव ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु, शहराच्या मध्यवर्ती भागात सर्रास इमारतींमध्ये तळमजल्यात दुकानगाळे सुरू करण्यात आले आहेत. अशा इमारतींवर मध्यंतरी दंडात्मक कारवाई केली जात होती. परंतु, सध्या ही कारवाई थंडावल्याने शहरातील पार्किंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.