For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

३० कोटी आणि नगराध्यक्षपदाची संदेश पारकर यांची होती मागणी

07:10 PM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
३० कोटी आणि नगराध्यक्षपदाची संदेश पारकर यांची होती मागणी
Advertisement

पालकमंत्री नीतेश राणे यांचा गौप्यस्फोट

Advertisement

कणकवली : प्रतिनिधी

३० कोटी आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन मला भाजपमध्ये घ्या अशी मागणी  शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी आमच्याकडे केली होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माझ्यासोबत त्यांनी  चर्चा केली. त्यांना पैसे देऊन घेतले असते तर मी भ्रष्टाचारी झालो असतो का?  त्यांची मागणी आम्ही धुडकावून लावत आमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, अशी भूमिका घेतली. म्हणूनच शहर विकास आघाडी जन्माला आल्याचा आरोप करतानाच कणकवली शहराचा विकास ही माझी जबाबदारी आहे. कणकवली शहर हे  जागतिक आदर्श शहर घडवू ही माझी गॅरंटी आहे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

Advertisement

येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. यावेळी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे व तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते. मोपा विमानतळ येथे रवींद्र चव्हाण व आपल्यासोबत पारकर यांची बैठकही झाली. ३० कोटी द्या आणि  नगराध्यक्षपद या अटीवर ते ठाम  होते. मात्र, त्यांची ही मागणी आम्ही धुडकावून लावली. आमच्या समीर नलावडे आणि इतर सहकाऱ्यांवर अन्याय करून तुम्हाला उमेदवारी देणार नाही. अशी स्पष्ट भूमिका घेत आम्ही संदेश पारकर यांची मागणी धुडकावून लावली. तसेच खासदार नारायण राणे यांनीही पारकर यांना पक्षात घेऊ नकोस , अशा स्पष्ट शब्दात सांगितल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

त्यामुळे भ्रष्टाचार आणि भय हे दाखवण्याचे मुद्दे आहेत. या लोकांना कणकवलीवासियांबद्दल प्रेम नाही तर स्वार्थच आहे. या स्वार्थापोटीच ही सगळी मंडळी एकत्र आली असल्याची टीका ही त्यांनी केली.

मंत्री नीतेश राणे म्हणाले, जर ३० कोटी रुपये आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी संदेश पारकर यांना दिले असती तर नीतेश राणे , रवींद्र चव्हाण हे आम्ही लोक यांच्यासाठी चांगले झाले असतो. भय आणि भ्रष्टाचार मुद्द्यांचा नामशेष झाला असता. भाजप पक्ष किती चांगला आहे हे या लोकांनी ओरडून सांगितले असते. मात्र, मला माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे. ज्या काळात राणे कुटुंबियांचा पडता काळ होता त्यावेळी ज्या लोकांनी आमच्या समवेत काम केले कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आम्हाला साथ दिली. अशा सर्व कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा होता. समीर नलावडे यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन कणकवलीत पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातील विकास पर्व पुढे घेऊन जायचे आहे आणि म्हणूनच संदेश पारकर यांना ठोकर मारून आम्ही समीर नलावडे यांना उमेदवारी दिली आणि त्यांना विजयी करण्यासाठी कणकवलीकर जनता आमच्या सोबत सज्ज आहे. उद्या २ डिसेंबर रोजी सकाळी कणकवलीकर जनता मतपेटीतून भारतीय जनता पार्टीसाठी कमळ या निशाणीवरील बटन दाबून मतदान करतील, असा विश्वासही यावेळी मंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.

संदेश पारकर यांनी ३० कोटीची व नगराध्यक्षपदाची मागणी केली होती. हे जर ते नाकारत असतील तर त्यांनी भालचंद्र महाराज व श्री देव स्वयंभूच्या मंदिरात येऊन तसे हात लावून सांगावे, असे आव्हानही राणे यांनी यावेळी दिले.

Advertisement
Tags :

.