ऑलिम्पिकसाठी पॅरिस सज्ज
ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच होणार नदीच्या काठी भव्यदिव्य उद्घाटन सोहळा : एआयसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिक सुरु होण्यासाठी अवघे चार दिवस राहिले आहेत. 26 जुलैपासून सुरु होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कुंभेमळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा खूपच अनोखा असणार आहे. हा सोहळा ऑलिम्पिक इतिहासातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असेल, असे बोलले जात आहे. ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून हा सोहळा खास बनवण्यासाठी फ्रान्स सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाने पॅरिसमधील ऑलिम्पिक तयारीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शहराच्या मध्यभागी असलेल्या सीन नदीच्या काठावर होणार आहे. ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वी, खेळाडू उद्घाटन समारंभात आपल्या देशाच्या ध्वजासह परेडमध्ये सहभागी होतात, यावेळीही तसेच होईल. पण यंदाची परेड ही सीन नदीवर आयोजित केली जाणार आहे. प्रत्येक देशाची बोट असणार असून या बोटी अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी सुसज्ज असतील. तब्बल साडे दहा हजार अॅथलिट असलेल्या बोटी सीन नदीच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे मार्ग काढत 6 किलोमीटर जाणार आहेत. यानंतर सीन नदीच्या बाजूला आयकॉनिक असा उद्घाटन समारंभ होईल. विशेष म्हणजे, ऑलिम्पिकच्या इतिहासात असा आगळावेगळा व भव्यदिव्य सोहळा प्रथम होणार आहे.
अनेक देशात उद्घाटन सोहळ्याचे आयोजन
विशेष म्हणजे, ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच असा भव्यदिव्य सोहळा आयोजित केला जात आहे. यासाठी फ्रान्स सरकारने खास व्यवस्था देखील केली आहे. पॅरिससह अन्य शहरात 80 विशाल अशा स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. याशिवाय, जगभरातील अनेक देशात ऑलिम्पिक सोहळा टीव्हीवर पाहता येणार आहे. याशिवाय युरोपमधील काही देशात हा सोहळा पाहण्यासाठी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. सीन नदीवर होणारा हा सोहळा पाहण्यासाठी तब्बल लाखो लोक येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
तब्बल 100 वर्षानंतर पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होत असल्याने फ्रान्ससाठी या स्पर्धेचे विशेष असे महत्व आहे. खेळाडूंच्या सुरक्षा व्यवस्थेपासून मैदानातील सुसज्जतेपर्यंत अनेक ठिकाणी नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. जगातील नामांकित अशा इंटेल कंपनीने खेळाडूंच्या मदतीसाटी चॅटबोट हे अॅप तयार केले आहे. त्याला अॅथलिट जीपीटी असे नाव देण्यात आले आहे. या अॅपद्वारे खेळाडूंना स्पर्धेतील नियम, अटी, स्पर्धेची ठिकाणे यासह इतर पूरक अशी माहिती मिळणार आहे. याशिवाय, स्पर्धेत प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. एआयद्वारे अतिउच्च तंत्रज्ञान, उच्च क्षमतेचे कॅमेरे यांचा वापर करण्यात येणार आहे.
ऑलिम्पिकसाठी कडेकोट सुरक्षा
ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना स्पर्धा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून पॅरिस शहरासह परिसराला लष्करी तळाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पॅरिसच्या सर्व रस्त्यावरुन पोलिसांच्या तुकड्या अहोरात्र गस्त घालताना दिसत आहेत. लष्कर, नौदल व हवाईदलासह निमलष्करी दले, दहशतवादविरोधी पथके यांच्यासह महिला कमांडो ठिकाठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. आकाशातून लढाऊ विमानांची गस्त वाढत आहे. विशेष म्हणजे, सीन नदीच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पडद्यासारखे भासणारे धातूचे कुंपण ऑलिम्पिकसाठी असलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची जाणीव करुन देत आहेत. तसेच सायबर हल्ल्यापासूनही बचाव करण्यासाठी तंत्रज्ञांच्या मदतीने ‘एआय‘ या आधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे.
क्रीडाग्राम गजबजली
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या 206 देशांच्या पथकापैकी अनेक देशांची पथके पॅरिसमध्ये दाखल झाली आहेत. या सर्वांची राहण्याची व्यवस्था पॅरिस शहराच्या शेजारीच उभ्या करण्यात आलेल्या क्रीडाग्राममध्ये करण्यात आली आहे. ही क्रीडाग्राम सर्व सोयींनी सुसज्ज अशी आहेत. याशिवाय, या क्रीडाग्रामसह पॅरिसच्या परिसरातील शहरामध्ये देखील खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अमेरिका, भारत, चीन, इंग्लंड, इटली, स्पेन यासह महत्वपूर्ण देशांची पथके दाखल झाल्यामुळे क्रीडाग्राम गजबजली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.