पॅरिस पॅरालिम्पिकवर शानदार सोहळ्याने पडदा
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस पॅरालिम्पिकचा एका शानदार सोहळ्यासह समारोप झाला. समारंभाची सुऊवात करताना फ्रेंच गायिका सांताने जॉनी हॅलीडेचे विख्यात ‘विव्रे पोर ले मेल्युर’ हे गीत सादर केले. तिच्या मधुर आवाजासोबत मागील तीन पॅरालिम्पिक गेम्समधील अनेक व्हिडिओ आणि प्रतिमा दाखविण्यात आल्या. तथापि, हवामान पोषक नसल्याने ‘कॉल्ड्रन फ्लाईट’ होऊ शकले नाही.
या सादरीकरणानंतर स्टेड दि फ्रान्स येथील अधिकृत स्टँडमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्य्रू पार्सन्स यांचे स्वागत झाले. त्यानंतर फ्रेंच ध्वज देशाचे राष्ट्रगीत वाजत असताना फडकविण्यात आला. फ्रेंच सैन्याच्या विविध कोअर्सनी ध्वज उंचावला. यावेळी उपस्थित लोकांनीही राष्ट्रगीत गायनात सूर मिळविला. त्यानंतर पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व देशांचा समावेश असलेली ‘परेड ऑफ नेशन्स’ झाली. विविध देशांच्या पथकांनी रिपब्लिकन गार्डच्या बँडच्या तालावर प्रवेश केला. यावेळी काही निवडक फ्रेंच आणि आंतरराष्ट्रीय पॉप गीते सादर करण्यात आली. त्यामुळे संचलनाला एक उत्सवी वातावरण प्राप्त झाले.
पॅरिस पॅरालिम्पिक, 2024 च्या समारोप समारंभात हरविंदर सिंग आणि प्रीती पाल हे भारताचे ध्वजवाहक राहिले. पॅरा-तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकून हरविंदर सिंगने इतिहास रचला. पॅरा-तिरंदाजीमधील हे भारताचे पहिले सुवर्णपदक होते. प्रीती पालने दोन कांस्यपदकांच्या कमाईसह या खेळांमधील भारताच्या विलक्षण यशामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय दलाने आपल्या ऐतिहासिक पॅरिस पॅरालिम्पिक मोहिमेची एकूण 29 पदकांसह समारोप केला, ज्यात सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि 13 कांस्यपदकांचा समावेश राहिला. या स्पर्धेच्या इतिहासातील देशाची ही सर्वांत मोठी कमाई आहे.
संचलनानंतर पॅरिस 2024 ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्सच्या आयोजन समितीचे अध्यक्ष टोनी एस्टँग्युएट यांनी मंचावर प्रवेश केला आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. पार्सन्स यांचेही भाषण झाले. त्यानंतर साऱ्या स्वयंसेवकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना मानवंदना देण्यात आली. जवळजवळ 2000 स्वयंसेवक यावेळी मध्यभागी असलेल्या मंचावर दाखल झाले आणि त्यांना उपस्थित प्रेक्षकांकडून जोरदार दाद देण्यात आली. पुढे आठ डान्सर दाखल होऊन त्यांनी ‘ब्रेकिंग’ची विविधता डीजे कट किलरच्या संगीतावर सादर केली. यात काही दिव्यांग नर्तकांचाही समावेश राहिला.