एसएसएलसी परीक्षा नोंदणी फीमधील वाढीमुळे पालक आर्थिक अडचणीत
दरवर्षी फीच्या रकमेत भर : प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फी माफी
बेळगाव : दहावीच्या अंतिम परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तब्बल 710 रुपये भरावे लागत आहेत. या व्यतिरिक्त फोटोचेही पैसे द्यावे लागत असल्याने पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरवर्षी या फीमध्ये वाढ केली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी दाखवून फी माफी करून घेण्याचा प्रयत्न काही पालकांकडून सुरू आहे. परंतु, फीपेक्षा अधिक रक्कम ही उत्पन्न दाखला काढण्यासाठी खर्च अधिक होत असल्याने निमूटपणे फी भरावी लागत आहे.
एसएसएलसी परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार मागील पंधरा दिवसांपासून एसएसएलसी परीक्षा रजिस्ट्रेशन फी भरून घेतली जात आहे. जनरल प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 710 रुपये द्यावे लागत आहेत. कॅटेगरी-1 मधील एक लाखाहून कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र फी भरावी लागत नाही. तर 2ए, 2बी, 3ए, 3बी यासारख्या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे उत्पन्न 44,500 रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना फी माफी देण्यात आली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना मात्र 710 रुपये तसेच फोटोसाठीचे 50 रुपये शाळांकडे जमा करावे लागत आहेत.
परीक्षा मंडळाकडून दरवर्षी यामध्ये वाढ केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी 500 रुपये असलेली परीक्षा फी आता 710 रुपये करण्यात आली आहे. एखाद्या पालकाचे दोन विद्यार्थी परीक्षेला बसणार असतील तर त्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आपले कौटुंबिक उत्पन्न 44500 रुपयांपेक्षा कमी दाखविण्यासाठी पालकांची धडपड सुरू आहे. परंतु, तातडीने उत्पन्न दाखला हवा असेल तर त्यासाठी 800 ते 1000 रुपये एजंटांना मोजावे लागत असल्याने रजिस्ट्रेशन फी भरलेली बरी म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे.
ऑनलाईन सेंटरमधून अनुत्तीर्ण अर्ज प्रक्रिया
मागील वर्षाच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी परीक्षेला बसण्याची संधी आहे. परंतु, रिपिटर विद्यार्थ्यांना शाळेऐवजी बाहेरून अर्ज करावे लागत आहेत. ऑनलाईन सेंटरमधून अनुत्तीर्ण विषयानुरुप फी भरून हे अर्ज करावे लागत आहेत. यापूर्वी हे अर्ज शाळेमध्ये उपलब्ध होते. परंतु, यावर्षीपासून यामध्ये बदल करण्यात आला आहे.