For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पालकांनो, शाळेची मान्यता तपासा!’

10:49 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘पालकांनो  शाळेची मान्यता तपासा ’
Advertisement

अधिकृत शाळांची यादी जाहीर : शाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असल्याने नाराजी

Advertisement

बेळगाव : विनापरवाना सुरू असणाऱ्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सार्वजनिक शिक्षण विभागाने विभागवार खासगी विनाअनुदानित शाळांची यादी जाहीर केली आहे. पालकांच्या सोयीसाठी ऑनलाईन ही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे पालकांना प्रवेश घेताना शाळेला मान्यता आहे की नाही, याबाबतची माहिती मिळणार आहे. बेळगावसह राज्यातील अनेक भागात विनापरवाना खासगी शाळा चालविल्या जात आहेत. काही शाळांनी परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. तर परवानगी नसतानाही अधिकचे वर्ग भरविले जात आहेत. विशेषत: शहरी भागात अनेक विनापरवाना शाळा सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी www.sdcedn.karnataka.gov.in या वेबसाईटवर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या शहराचे नाव घालून पीडीएफ फाईल डाऊनलोड केल्यास माहिती उपलब्ध होत आहे. यामध्ये शाळांची संपूर्ण माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. बेळगाव शहरात 119, बेळगाव ग्रामीण 68 व खानापूरमध्ये 29 खासगी विनाअनुदानित शाळा असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. परंतु, खासगी शाळांची प्रवेश प्रक्रिया ही फेब्रुवारी महिन्यापासून होत असल्याने त्यापूर्वी शाळांची यादी जाहीर करणे गरजेचे होते. परंतु, शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना शाळांची यादी जाहीर केल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

खानापूर तालुक्याची यादी कन्नडमध्ये

Advertisement

बेळगाव शहर व तालुक्यातील शाळांची यादी इंग्रजीमध्ये देण्यात आल्याने पालकांना अनधिकृत शाळांची माहिती तात्काळ मिळत आहे. परंतु, खानापूर तालुक्यातील विनाअनुदानित खासगी शाळांची यादी कन्नडमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यात 95 टक्के मराठी भाषिक आहेत. त्यांना कन्नड अवगत नसल्याने किमान इंग्रजीमधून तरी यादी प्रसिद्ध करणे गरजेचे होते.

Advertisement
Tags :

.