पालकांच्या इंग्रजी शाळेच्या आकर्षणामुळे सरकारी शाळांच्या पटसंख्येत घट
शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांची माहिती
बेळगाव : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होण्याचे मुख्य कारण पालकांचे इंग्रजी शाळेकडे पालकांचे आकर्षण असून गेल्या 15 वर्षात 17 लाख विद्यार्थ्यांची संख्या घटली असल्याचे शिक्षण आणि साक्षरतामंत्री मधु बंगारप्पा यांनी अधिवेशनात सांगितले. माजी शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना बंगारप्पा यांनी सांगितले की, पालकांचे इंग्रजी शाळेकडे असणारे आकर्षण, केंद्रीय अभ्यासक्रम, स्थलांतर आणि खासगी शाळांची झपाट्याने वाढ अशा विविध कारणांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून यासाठी अनेक उपाययोजना सुरु आहेत. सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी 14 नोव्हेंबर 2025 ते 30 जून 2026 पर्यंत राज्यव्यापी मोहीम आखली आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये 5437 संगणक कक्षांची निर्मिती केली जाईल. तसेच 2025-26 शैक्षणिक वर्षात 1072 प्रयोगशाळा, 3862 स्मार्ट वर्ग आणि 173 शाळांमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगशाळांची निर्मिती केली जाणार असल्याचे मधु बंगारप्पा यांनी सांगितले.