पारस म्हाम्ब्रे मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक
वृत्तसंस्था/ मुंबई
पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने भारताचे माजी क्रिकेटपटू व गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांची येत्या मोसमासाठी पुन्हा आपल्या संघात गोलंदाज प्रशिक्षक म्हणून सामील करून घेतले आहे.
मुंबई इंडियन्सकडे सध्या लंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा कार्यरत असून त्याच्यासमवेत पारस म्हाम्ब्रेही काम पाहणार आहेत. ‘पारस म्हाम्ब्रे संघात पुन्हा परतले असून गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केल्याचे आम्ही जाहीर करीत आहोत. प्रमुख प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यासमवेत मलिंगा व म्हाम्ब्रे कोचिंग स्टाफमध्ये असतील,’ असे एमआयने निवेदनाद्वारे सांगितले.
पारस यांनी यापूर्वीही गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून एमआयमध्ये काम पाहिले असून 2013 आयपीएल, चॅम्पियन्स लीग टी-20 (2011, 2013), उपविजेतेपद (2010) व दोनदा प्लेऑफमध्ये मुंबईने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मजल मारली होती. त्यांनी भारतीय टी-20 संघाचेही गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कामगिरी केली असून यावर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपपर्यंत त्यांचा करार होता. या जेतेपदानंतर त्यांचा करार संपुष्टात आला होता.
1996-1998 या कालावधीत त्यांनी भारताचे दोन कसोटी व तीन वनडेमध्ये प्रतिनिधित्व केले आणि एकूण 5 बळी मिळविले. मुंबई रणजी संघातून खेळताना त्यांनी 91 प्रथमश्रेणी सामन्यात 284 बळी मिळविले आणि लिस्ट ए च्या 83 सामन्यात 111 बळी मिळविले.