पॅरालिम्पिक पदकविजेत्यांवर बक्षीसांचा वर्षाव
सुवर्ण विजेत्याला 75 लाख, रौप्यविजेत्याला 50 तर कांस्य विजेत्याला मिळणार 30 लाख
आता लक्ष्य लॉस एंजिल्स पॅरालिम्पिक : क्रीडा मंत्रालयाची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदाच्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करताना 7 सुवर्णपदकासह एकूण 29 पदके जिंकण्याचा विक्रम केला. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. आता, पदक विजेत्या खेळाडूंचा केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे गौरव करण्यात येणार आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला 75 लाख, रौप्यविजेत्याला 50 लाख तर कांस्यविजेत्याला 30 लाख रुपये देणार असल्याची घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी केली. तसेच 2028 लॉस एंजिल्स पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी आधुनिक सोयीसुविधा पुरवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पॅरिसमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने 7 सुवर्ण, 9 रौप्य व 13 कांस्यपदकासह 29 पदके जिंकली. पदकतालिकेत भारताने आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 18 वे स्थान पटकावले. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंतची शानदार कामगिरी नोंदवली. दरम्यान, क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना रोख पारितोषिके जाहीर केली. ज्यात सुवर्णपदक विजेत्यांना 75 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना 50 लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्यांना 30 लाख रुपये देण्यात येतील.
लक्ष्य लॉस एंजिल्स पॅरालिम्पिक
कमी वयात पायाने तिरंदाजी करत भारताचे नाव रोशन करणाऱ्या शीतल देवीची कामगिरी कौतुकास्पद अशी आहे. शीतलने मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. तिला 22.5 लाख रुपये मिळतील. तसेच तिला तयारीसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकासह अन्य सुविधा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पदक विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी आयोजित एका भव्य कार्यक्रमात क्रीडामंत्र्यांनी ही घोषणा केली. 2028 लॉस एंजिल्स पॅरालिम्पिकमध्ये अधिक पदके जिंकण्यासाठी पॅरा अॅथलीट्सना पूर्ण पाठिंबा आणि आधुनिय सोयी सुविधा देण्याचे आश्वासनही मांडविया यांनी दिले.
मांडविया म्हणाले की, ‘देश पॅरालिम्पिक आणि पॅरा स्पोर्ट्समध्ये पुढे जात आहे. 2016 मध्ये 4 पदक जिंकणाऱ्या भारताने टोकियोमध्ये 19 पदके आणि पॅरिसमध्ये 29 पदके जिंकली. भारतीय खेळाडूंनी मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. चार वर्षांनी अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी आतापासून तयारीवर भर देण्याचा आमचा प्रयत्न असेल. यासाठी दर्जेदार प्रशिक्षक, खेळाडूंना तयारीसाठीच्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी आमचा भर असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मायदेशात जंगी स्वागत
भारताने पॅरिस पॅरालिम्पिकमधील आपल्या ऐतिहासिक मोहिमेची सांगता 29 पदकांसह केली. ज्यात 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्यपदकांचा समावेश आहे, ही स्पर्धेच्या इतिहासातील देशाची सर्वोत्तम कामगिरी आहे. मंगळवारी सर्व खेळाडूंचे नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. मायदेशी परतल्यावर शेकडो चाहत्यांनी फुल, हार आणि मिठाई देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी क्रीडा मंत्रालयाचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते