पॅरालिम्पिकमध्ये पॅरा शटलरची कमाल
बॅडमिंटनमध्ये मनीषा, तुलसीमती, नित्या, सुकांत, नितीन व सुहास उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिसमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या पॅरा शटलरनी कमाल केली आहे. आतापर्यंत, नितीश कुमार, सुहास थथीराज व सुकांत कदम यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. महिलांत मनीषा रामदास, तुलसीमती मुरुगेसन व नित्या सिवान यांनी देखील सेमीफायनल गाठण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, पुरुषांत सुकांत कदम व सुहास तर महिलांत तुलसीमती व मनीषा रामदास यांच्यात उपांत्य सामना होणार आहे. यामध्ये जो जिंकेल त्याचे किमान रौप्यपदक निश्चित होणार आहे.
रविवारी पॅरा बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत भारताच्या मनीषा आणि नित्याने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. मनीषा रामदासने चमकदार कामगिरी करत जपानच्या मामिको टोयोडाचा 21-13 आणि 21-16 असा पराभव केला. तसेच दुसऱ्या एका उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत नित्या सिवानने पोलंडच्या ऑलिव्हिया झिम्झिएलचा 21-4, 21-7 असा पराभव केला. आता, उपांत्य फेरीत मनीषा रामदासचा सामना मायदेशी सहकारी तुलसीमतीशी होणार आहे. यामध्ये जो जिंकेल त्याचे मेडल पक्के होईल. याशिवाय, महिला गटातील नित्या सिवानचा उपांत्य सामना चीनच्या लिन शुआनगाबोशी होईल. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा पुरुष बॅडमिंटन वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुकांत कदम आणि सुहास यथिराज यांच्यामध्ये सामना होणार आहे. यामधील ज्या शटलरचा विजय होईल तो फायनल गाठेल आणि कमीतकमी सिल्वर मेडल पक्के करेल. तर नितीश कुमारचा सामना जपानच्या फुजिआराशी होणार आहे.
नेमबाजीत अवनी-सिद्धूला पराभवाचा धक्का
पॅरा नेमबाजीत 10 मीटर एअर रायफलच्या मिश्र प्रकारात सिद्धार्थ आणि अवनी या जोडीचे अंतिम फेरीतील स्थान हुकले. अवनी 632.8 गुणांसह 11 व्या तर सिद्धार्थ 628.3 गुणांसह 28 व्या स्थानावर राहिले. तसेच, श्रीहर्ष देवारे•ाr रामकृष्ण देखील 10 मीटर एअर रायफल प्रोन एसएच-2 स्पर्धेच्या पात्रता फेरीतून बाहेर पडला आहे. तो 630.2 गुणांसह 26 व्या स्थानावर राहिला. धावपटू प्रीती पाल महिलांच्या 200 मीटर स्पर्धेत सहभागी होणार आहे. प्रीतीने महिलांच्या 100 मीटर प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.
भालाफेकमध्ये प्रवीण आठव्या स्थानी
2024 च्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या प्रवीणला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या एफ-57 भालाफेक प्रकारात प्रवीणने आठव्या प्रयत्नात 42.12 मी. ची नोंद केली. या क्रीडा प्रकारात उझबेकच्या ओडीलोव्हने 50.32 मी. ची नोंद करत सुवर्णपदक, तुर्कीच्या खेलवंडीने 49.57 मी. ची नोंद करत रौप्य आणि ब्राझीलच्या लिनेस नोब्रेने 49.46 मी. ची नोंद करत कांस्यपदक मिळविले.
अनिता-नारायण आठव्या स्थानी
नौकानयन (रोईंग) पीआर 3 मिश्र दुहेरी स्कूल्स प्रकारातील अंतिम फेरीत भारताच्या अनिता आणि नारायण यांना आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या जोडीने 8:16.96 सेकंदाचा अवधी घेतला. त्याचप्रमाणे महिलांच्या टी-11 1500 मी. धावण्याच्या शर्यतीतील प्राथमिक फेरीत भारताच्या रक्षिता राजूला अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. तिने 5 मिनिटे 29.92 सेकंदाचा अवधी घेत चौथे स्थान मिळविले.