पंतचा छप्पर फोडणारा जबरदस्त फटका
वृत्तसंस्था/ बेकेनहॅम
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 20 जून रोजी लिड्स येथे सुरू होईल. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाने नेटमध्ये आपल्या सरावाला प्रारंभ केला आहे. सोमवारी सरावसत्रामध्ये उपकर्णधार ऋषभ पंतने फलंदाजीचा सराव करताना मारलेला फटका छप्पर फोडणारा ठरला.
या सत्रात भारतीय फलंदाजांनी फलंदाजीचा चांगलाच सराव केला. संघातील खेळाडूंनी उत्तुंग फटके मारण्यावर भर दिला होता. ही कसोटी मालिका भारतीय क्रिकेट इतिहासातील एक युग-परिभाषित मालिका ठरेल कारण रोहीत शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांच्या निवृत्तीनंतर नवीन चेहऱ्यांचा भारतीय कसोटी क्रिकेट संघ 2025-27 च्या आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेला गिलच्या नेतृत्वाखाली नवा प्रारंभ करणार आहे.
सोमवारी नेटमध्ये भारतीय संघाने काही तास सराव केला. या सरावामध्ये कर्णधार गिल, पंत, बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांचा समावेश होता. या सराव सत्रामध्ये संघाचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर तसेच प्रशिक्षक सदस्यांनी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन केले. गिल आणि पंत यांनी फलंदाजीच्या सरावावर तसेच सिराज आणि बुमराह यांनी गोलंदाजीच्या सरावावर अधिक भर दिला होता. संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी. दिलीप यांनी खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणाचा सराव करवून घेतला. या सराव सत्रामध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर गिलने चेंडू सोडून देण्यावर भर दिला. तर ऋषभ पंतने वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर जबरदस्त षटकार मारला. ज्यामुळे बेकेनहॅम येथील सुविधेच्या छताचा एक भाग तुटला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील सामने लिड्स, एजबॅस्टन तसेच लंडनमधील लॉर्ड्स, ओव्हल आणि मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफोर्ल्ड मैदानावर खेळविले जाणार आहेत.