पंतची स्फोटक खेळी, 145 धावांची आघाडी
सिडनी कसोटी रोमांचक वळणावर : दुसऱ्या दिवशीही 15 विकेट्स
वृत्तसंस्था/ सिडनी
सिडनी येथे खेळवला जात असलेला भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा व अंतिम कसोटी सामना रोमांचक वळणावर आला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 181 धावांत ऑलआऊट केले व चार धावांची अल्प आघाडी मिळवली. यानंतर ऋषभ पंतच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 141 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला भारतीय संघाकडे आता 145 धावांची आघाडी असून रविंद्र जडेजा (8) व वॉशिंग्टन सुंदर (6) धावांवर खेळत आहेत. तिसऱ्या दिवशी या जोडीसह अखेरच्या चार विकेट्सच्या मदतीने भारतीय संघ ऑस्ट्रेलियासमोर किती धावांचे टार्गेट सेट करणार हे पहावे लागेल.
शनिवारी ऑस्ट्रेलियन संघाने 1 बाद 9 धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. डावातील सातव्याच षटकात बुमराहने लाबुशेनला (2) माघारी पाठवले. युवा फलंदाज सॅम कोन्स्टासचा अडथळा सिराजने दूर केला. कोन्स्टासला केवळ 23 धावा करता आल्या. स्टार फलंदाज ट्रेव्हिस हेड या सामन्यातही अपयशी ठरला. सिराजने त्याला केएल राहुलकरवी झेलबाद केले. हेडला 2 धावा करता आल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाची 11.2 षटकांत 4 बाद 39 अशी स्थिती होती. कांगारुंचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर अनुभवी स्टीव्ह स्मिथ व पदार्पणवीर ब्ल्यू वेबस्टर यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी साकारली. कठीण परिस्थितीत वेबस्टरने संयमी खेळी साकारताना अर्धशतक झळकावले. त्याने 105 चेंडूचा सामना करताना 5 चौकारासह 57 धावा फटकावल्या. त्याला स्मिथने 57 चेंडूत 33 धावा करत चांगली साथ दिली. या खेळीदरम्यान स्मिथने 4 चौकार व 1 षटकार लगावला. प्रसिद्ध कृष्णाने त्याला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर अॅलेक्स केरी (21), पॅट कमिन्स (10) धावा केल्या. अर्धशतकवीर वेबस्टरला प्रसिद्ध कृष्णाने तंबूचा रस्ता दाखवला. वेबस्टर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 51 षटकांत 181 धावांत आटोपला.
शुभमन गिल, केएल, विराट पुन्हा फ्लॉप
ऑस्ट्रेलियाचा डाव 181 धावांत आटोपल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावाची सुरुवात केली. आक्रमक अंदाजात बॅटिंग करताना यशस्वी जैस्वालने दमदार सुरुवात करुन दिली. दुसऱ्या बाजूला लोकेशही संयमी अंदाजात खेळताना दिसला. पण बोलँडने ही सेट झालेली जोडी आठव्या षटकांत फोडत भारताला पहिला धक्का दिला. केएल राहुलला त्याने 13 धावांवर क्लीन बोल्ड केले. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 42 धावांची भागीदारी रचली. यानंतर जैस्वालच्या रुपाने टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली. जैस्वालला 22 धावांवर बोलँडने माघारी पाठवले. सलामी जोडी बाद झाल्यानंतर विराट कोहली व शुभमन गिलकडून अपेक्षा होत्या. पण हे दोघेही स्वस्तात बाद झाले. विराट बोलँडच्या ऑफ स्टंपबाहेर जाणाऱ्या चेंडूवर फसला आणि त्याने आपली विकेट गमावली. विराटला केवळ 6 धावा करता आल्या तर गिल 13 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी 78 धावांत टीम इंडियाने 4 विकेट्स गमावल्या होत्या.
पंतची कसोटीत टी 20 खेळी
आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर मैदानात उतरलेल्या पंतने दर्जेदार खेळाचा नजराणा पेश केला. कसोटीत टी 20 प्रमाणे धमाकेदार फलंदाजी करताना त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावले. पंतने 33 चेंडूत 6 चौकार व 4 षटकारासह 61 धावांची तुफानी खेळी साकारली. यावेळी त्याने जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. आक्रमक खेळणाऱ्या पंतला कमिन्सने बाद केले. यानंतर नितीश रेड्डीही (4) स्वस्तात माघारी परतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 32 षटकांत 6 बाद 141 धावा केल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 185 व दुसरा डाव 32 षटकांत 6 बाद 141 (जैस्वाल 22, केएल राहुल 13, गिल 13, पंत 61, जडेजा खेळत आहे 8, सुंदर खेळत आहे 6, स्काटॅ बोलँड 4 बळी, कमिन्स व वेबस्टर प्रत्येकी एक बळी).
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 51 षटकांत सर्वबाद 181 (कॉन्स्टास 23, स्टीव्ह स्मिथ 33, वेबस्टर 57, केरी 21, सिराज व प्रसिद्ध कृष्णा प्रत्येकी तीन बळी, बुमराह, नितीश रे•ाr प्रत्येकी दोन बळी).
ऋषभ पंतचे 29 चेंडूत अर्धशतक
भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सिडनी कसोटीत टी 20 स्टाईल फलंदाजी केली. दुसऱ्या डावात पंतने अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह पंत पुन्हा एकदा भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला. पंतने आक्रमक फलंदाजी करत 33 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 184.85 होता. पंतने 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी, 2022 मध्ये, त्याने बेंगळूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.
भारतासाठी कसोटीतील सर्वात वेगवान अर्धशतक
28 चेंडू - ऋषभ पंत वि श्रीलंका, बेंगळूर, 2022
29 चेंडू - ऋषभ पंत वि ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2025
30 चेंडू - कपिल देव वि पाकिस्तान, कराची, 1982
31 चेंडू - शार्दुल ठाकूर वि इंग्लंड, ओव्हल, 2021
31 चेंडू - यशस्वी जैस्वाल वि बांगलादेश, कानपूर, 2024.
जसप्रीत बुमराहने अचानक सोडले मैदान
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपला पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला जेव्हा जसप्रीत बुमराह सामन्याच्या मध्यभागी अचानक मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर प्रशिक्षण किटमध्ये स्टेडियम सोडताना दिसला. त्यावेळी बुमराहला मैदानावर काही त्रास झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात होती. तो टीम इंडियाच्या वैद्यकीय पथकासोबत दिसला. दरम्यान, टीम इंडियाचा युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने बुमराहच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट दिले आहेत. बुमराहच्या पाठीला दुखापत आहे. तो स्कॅनसाठी गेला होता. वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि स्कॅनचा निकाल आल्यावर पुढील गोष्टी आम्हाला कळतील. परंतु याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच तो दुसऱ्या डावात गोलंदाजी करेल की नाही, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बुमराह है तो रेकॉर्ड है! 5 सामने 32 विकेट्स
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात बुमराहने मार्नस लाबुशेनची विकेट घेत इतिहास रचला आहे. तो ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. या यादीत त्याने बिशन बेदी यांना मागे टाकले आहे. बुमराहसाठी ही मालिका आतापर्यंत चांगली ठरली आहे. या मालिकेत त्याने तीन वेळा 5 विकेट हॉल घेण्यासोबतच 32 विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियन भूमीवर भारतीय गोलंदाजाने एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम बेदी यांच्या नावावर होता, ज्यांनी 1977-78 मध्ये 31 विकेट घेतल्या होत्या. परंतु आता बुमराहने लाबुशेनच्या विकेटसह त्यांचा विक्रम मोडला आहे.
ऑस्ट्रेलियातील एका मालिकेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स
- 32 विकेट्स - बुमराह 2024-25
- 31 विकेट्स - बिशनसिंह बेदी 1977-78
- 28 विकेट्स - चंद्रशेखर 1977-78.