पंतनामाने अवघी पंतबाळेकुंद्री दुमदुमली
पंतबाळेकुंद्री येथील पालखी सोहळ्याला कर्नाटक-महाराष्ट्रातील हजारो भाविकांची उपस्थिती
युवराज पाटील/सांबरा
हजारो भाविकांच्या उपस्थितीत व पंतनामाच्या गजरात गुरुवारी श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे पालखी सोहळा पार पडला. अखंड भजन सेवा व पंतनामाने अवघी पंत बाळेकुंद्री दुमदुमली. पालखी सोहळ्याला कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे पंत बाळेकुंद्री भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. प्रारंभी पहाटे 5 वाजता मंदिर परिसरात श्रींचा पुण्यस्मरण सोहळा पार पडला. त्यानंतर सकाळी 7 वाजता श्रींची पालखी गावातील श्रींच्या वाड्यातून पारंपरिक लवाजम्यासह समारंभपूर्वक निघाली. पालखी मिरवणुकीमध्ये कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज, भुदरगड, गारगोटी, पुणे, ठाणे, मुंबई आदी ठिकाणची भजनी मंडळे व टिपरी पथके होती. श्रीपंत पदांवर आधारित पालखी मिरवणुकीत अखंड भजन सेवा सुरू होती. पंत भक्तीत तल्लीन होऊन पंतभक्त न्हाऊन निघत होते. पालखीचे ठिकठिकाणी आरती ओवाळून स्वागत करण्यात येत होते. दुपारी पालखी आमराईतील श्रीपंत स्थानी पोहोचली. बुधवारी दिवसभर मंदिरामध्ये श्रींच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती.
रात्री पालखी सेवा
रात्री 8 वाजता पालखी सेवेला प्रारंभ झाला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत पालखी सेवा सुरू होती. मंदिर परिसरात अखंड भजन सेवाही सुरू होती. पालखी सेवा व भजन पाहण्यासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी झाली होती. यात्रेनिमित्त राज्य परिवहन मंडळाने शहर बसस्थानक येथून विशेष बससेवा सुरू केली होती. या बससेवेचा भक्तांना चांगलाच लाभ झाला. भक्तांच्या वाहनांसाठी मेन रोडनजीक पार्किंगची सोय केली होती. यात्रेमध्ये मारीहाळ पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
यात्रेची आज सांगता
शुक्रवार दि. 10 रोजी दुपारी 12 वाजता श्रींचा महाप्रसाद होणार आहे. दुपारी 3 ते 5 या वेळेत प्रेमानंद टिपरी कार्यक्रम होईल. सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखी आमराईतील पूज्यस्थानी जाऊन गावातील वाड्यात पोहोचेल व उत्सवाची सांगता होईल. यात्रेनिमित्त पंत बाळेकुंद्रीत विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मुलांच्या मनोरंजनासाठी पाळणे व विविध खेळ थाटण्यात आले आहेत.