शेवटच्या कसोटीतून पंत बाहेर
वृत्तसंस्था / मँचेस्टर
31 जुलैपासून खेळविल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातून भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले आहे. आता या शेवटच्या कसोटीसाठी पंतच्या जागी तामिळनाडूच्या एन. जगदीशनला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
मँचेस्टरमध्ये या मालिकेतील झालेल्या चौथ्या कसोटीत खेळताना ऋषभ पंतच्या उजव्या पायाचे हाड मोडल्याने त्याला आता काही दिवस क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागेल. दुखापतीस्थितीतही त्याने चौथ्या कसोटीत चिवट खेळी करत अर्धशतक झळकविले होते. कर्णधार गिल, रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या चिवट शतकी खेळांमुळे भारताला ही कसोटी अनिर्णीत राखता आली. आता या मालिकेत इंग्लंडचा संघ 2-1 असा आघाडीवर असून भारतीय संघाला शेवटची कसोटी जिंकून बरोबरी साधण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही शेवटची कसोटी केनिंग्टन ओव्हल येथे होणार आहे.
भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, ध्रुव ज्युरेल, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अनशुल कंबोज, अर्षदीप सिंग, एन. जगदीशन्