पनीरसेल्वम यांचा एनडीएला धक्का
वृत्तसंस्था/चेन्नई
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी ‘एनडीए’पासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. मॉर्निंग वॉकदरम्यान मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतल्यानंतर लगेचच पनीरसेल्वम यांनी हे पाऊल उचलले. तामिळनाडूचे माजी मंत्री आणि पनीरसेल्वम यांचे जवळचे सहकारी पनरुती एस रामचंद्रन यांनी यासंबंधीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत एनडीए सोडल्यानंतर, राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची चिन्हे आहेत. 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी पनीरसेल्वम लवकरच संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. सध्या कोणत्याही पक्षासोबत युती केली जाणार नाही. निवडणुका जवळ आल्यावर युतीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करतानाच पनीरसेल्वम यांनी अभिनेता विजय यांच्या पक्षासोबत हातमिळवणी करण्याची शक्यता नाकारलेली नाही.