For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजी, तेरी मांडवी मैली हो गयी!

06:05 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
पणजी  तेरी मांडवी मैली हो गयी
Advertisement

कर्नाटकाच्या डोंगरमाथ्यावरुन येणारी म्हादई कर्नाटक स्वत:च्या बाजूने वळवू पाहत आहे, तर दुसऱ्या बाजूने गोव्याच्या हद्दीत असलेल्या मांडवीवर गोवाच अत्याचार करु लागला आहे. एकेकाळी सुंदर, साजिरी, गोजिरी वाटणारी, तिच्यावर चालणाऱ्या होड्या, फेरीबोटी, आणि एवढेच नव्हे तर खनिजवाहू बार्जेस... या साऱ्यांच्या समुच्चयाने स्वत:कडे लक्ष वेधून घेणारी मांडवी आता झालीय कुरुप अन् दुर्गंधीमय.

Advertisement

देशातील विविध राज्यांमधील तसेच जगाच्या कानाकोपऱ्यांतील पर्यटकांसाठी आकर्षण असलेले ठिकाण म्हणजे गोवा. जगाच्या नकाशावर पाहिला तर बिंदुएवढाही दिसणार नाही. पण शेवटी या जगात अणुरेणूही असतातच! तसाच हा गोवा समजूया. अगदी छोटासाच असलेला हा गोवा जगात मात्र स्वत:चे नाव कमवून उभा आहे. सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या या गोव्याची राजधानी पणजी. गोव्याची जीवनदायीनी मांडवी. मांडवी नदीच्या काठावर वसलेली पणजी. गोव्यातील अन्य शहरे, गावे आज कात टाकत असताना राजधानी असलेली पणजी मात्र भकास होऊ लागलेली आहे. कारणे अनेक आहेत. दोषारोपही अनेक. आरोप प्रत्यारोपांना तर अंतच नाही. काही राजकारण्यांची पणजी जणू जागीरच! पण कोणी तिचा सांभाळ करण्याचा विचार करत नाही, उलट तिला दिवसाढवळ्या लुटण्यातच काहींची हयात जात आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर ठप्पशी झालेली ही पणजी. बकाल स्वरुप धारण करु लागलेली ही पणजी. या पणजीची शान आहे की होती, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. राजधानीच्या या शहराप्रमाणेच गोव्याची गंगा असलेल्या या मांडवीवर सुरु आहेत अत्याचार... शारीरिक अन् मानसिकही! तिची घुसमट सुरु आहे. मांडवीतून येणारी असह्या दुर्गंधी स्थानिकांना तसेच पर्यटकांनाही त्रासदायक आहे. आरोग्यास धोकादायक आहे. “क्या यह बदबू... छी... असे म्हणत पर्यटकांना नाक बंद करुन जावे लागते. एकेकाळी सुंदर, साजिरी, गोजिरी वाटणारी, तिच्यावर चालणाऱ्या होड्या, फेरीबोटी, आणि एवढेच नव्हे तर खनिजवाहू बार्जेस... या साऱ्यांच्या समुच्चयाने स्वत:कडे लक्ष वेधून घेणारी मांडवी आता झालीय कुरुप अन् दुर्गंधीमय. खरंच, ‘पणजी, तेरी मांडवी मैली हो गयी’!

कर्नाटकाच्या डोंगरमाथ्यावरुन येणारी म्हादई कर्नाटक स्वत:च्या बाजूने वळवू पाहत आहे, तर दुसऱ्या बाजूने गोव्याच्या हद्दीत असलेल्या मांडवीवर गोवाच अत्याचार करु लागला आहे. विशेषत: पणजीत मांडवीवर जे अत्त्याचार सुरु आहेत, ते आताच थांबविले नाही, तर येणाऱ्या काळात निसर्ग सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. मिरामारपासून अगदी उसगावपर्यंत मांडवी पोहोचलेली आहे. पणजीच्या पुढे रायबंदर, ओल्ड गोवा असा प्रवास करत ती उसगावर्पंत पोहोचते, पण पणजी वगळता कुठेच मांडवीच्या पात्रात दुर्गंधी येत नाही. साधारणपणे सांतामोनिका येथील व्रुझ बोट धक्क्यानंतर छोटासा पूल पार केल्यानंतर भाऊसाहेब बांदोडकर मार्गावरुन

Advertisement

कॅसिनो, पणजी-बेती फेरीबोट धक्का, मार्केट ते आयनॉक्स परिसरपर्यंत मांडवीतून जी दुर्गंधी येते ती नुसतीच दुर्गंधी नसते काही माणसांना ओकाऱ्या आणणारीही असते. पर्यटक पणजीत फिरत असताना याच मार्गाचा अवलंब करतात, कारण मांडवीच्या तिरावरुन जाणाऱ्या मार्गाने चालत जाण्याचा आनंद वेगळाच असतो, मात्र आता तो ना पर्यटकांना ना स्थानिकांना मिळतो.

 भाऊसाहेब बांदोडकर मार्गावरचा हा संपूर्ण भाग दिसायला स्वच्छ, नीटनेटका वाटतो.

आयनॉक्सच्या समोर उभारण्यात आलेला योग सेतू आणि योगाचे महत्व अधोरेखित करणारा योगपथ हा नवीन विकसित भागही पणजीची शोभा वाढवित आहे. पण या संपूर्ण दीड किलोमीटरच्या अंतरात सायंकाळच्या वेळीस मांडवीतून येणारी दुर्गंधी आता लोकांना सहन होत नाही. काहीवेळा ही दुर्गंधी रात्री दीड, दोन वाजल्यानंतर सुरु होते, तर काही वेळेस सकाळच्या वेळी सुरु होते. मात्र ही दुर्गंधी अधिकतर ओहोटीच्यावेळी येते, हे निरीक्षण आहे. पावसाळा सुरु असताना ही दुर्गंधी येत नाही. या रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या स्थानिकांना, पर्यटकांना ही दुर्गंधी सोसावी लागते. बंद एसी कारमधून प्रवास करणाऱ्या लोकप्रतिनिधींना, सरकारी अधिकाऱ्यांना ही दुर्गंधी येत नसावी.

ही दुर्गंधी सर्वांनाच घातक ठरत आहे.

अॅसिडीटीचा त्रास असलेल्या काही व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत असतो, त्याचवेळी अशी दुर्गंधी आली तर त्याला आणखी त्रास होतो. अस्थमा रुग्णांनाही त्रास होतो. एकंदरीत दुर्गंधी कुणाला त्रासदायक नाही, असे कोणीही नाही. स्थानिक लोक ही दुर्गंधी सोसत असतातच, पण पर्यटकांनाही ती सहन करावी लागत आहे. भाऊसाहेब बांदोडकर मार्गाच्या बाजूला असलेल्या हॉटेलमधील पर्यटकांनी सायंकाळच्या वेळी वारा छान येतो म्हणून खिडक्या उघड्या ठेवू पाहिले तर ही दुर्गंधी, नकोच ही पणजी.. असे करुन सोडते. पदपथावरुन चालत ‘जीवाचा गोवा’ करणाऱ्यांनाही नाक मुठीत धरुन जाण्यास प्रवृत्त करते व मनातून ‘असली कसली ही दुर्गंधीमय पणजी’ असे म्हणण्यासही भाग पाडून जाते. मांडवीतून येणाऱ्या दुर्गंधीची ही समस्या केवळ एकट्या पणजीची नसून संपूर्ण गोव्याची आहे. ही दुर्गंधी सोसून परत जाणारे पर्यंटक काय संदेश देतील जगाला, याचा विचार करायला हवा. एकतर गोव्यात येणारे बहुतेक पर्यटक पणजीला टाळून ज्याठिकाणी देहभान हरवून जीवाचा गोवा करता येतो, अशा कळंगुट, बागा, हरमल व अन्य समुद्रकिनाऱ्यांकडे जातात. मिरामारसारख्या सोज्वळ समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक कमींच जातात. मात्र कॅसिनोंनी भरलेल्या मांडवीतिरी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. देशभरातील पर्यटक आपल्या लहान मुलांना, म्हणजे ज्यांना धड आई म्हणता येत नाही, अशाही मुलांना घेऊन देशी पर्यटक कॅसिनोंमध्ये असतात. कॅसिनोंच्या दहा बारा मोठ्या बोटी व त्यांच्याच आणखी छोट्या बोटी मांडवीवर अत्त्याचार करत आहेत. मांडवीत काय काय मिसळवीत असतात ते कोणी सांगावे? सायंकाळी चार ते पहाटे चारपर्यंत हजारो स्त्रिया, पुरुष, मुले कॅसिनोंवर असतात. बऱ्याचजणांचे खानपान, अन्य विधी तेथेच होतात. अशा सर्वांचा मैला मांडवीत तर सोडला जात नाही, ना? असा संशय जागृत पणजीकरांना अगोदरपासूनच येत आहे. याबाबत अनेकवेळा आवाज करण्यात आला. वृत्तपत्रांमधून बातम्याही प्रसिद्ध झाल्या. तेथील मैला मलनिस्सारणासाठी नेला जातो, असेही सांगण्यात आले. काहीही असले तरी मांडवीतून दुर्गंधी येतेय ही वस्तुस्थिती आहे. ती कशामुळे येते? तिला जबाबदार कोण? हे शोधून काढण्याचे काम सरकारी यंत्रणांनी करायला हवे. कारणे शोधून काढल्यानंतर त्याला कोण जबाबदार आहेत, हे शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी. हे जेवढ्या तातडीने होईल, तेवढे मांडवीचे आणि पणजीचेही आरोग्य जागेवर राहील!

राजू भिकारो नाईक

Advertisement
Tags :

.