पन्हाळा तालुक्यात धूळवाफ भात पेरणीची धांदल; अंतरमशागतीसाठी जोर
उत्रे/ वार्ताहार
रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी भात पेरणीस सुरूवात केल्याचे चित्र पन्हाळा तालुक्यात दिसत आहे. धूळ वाफ्यावर पेरणी सुरु असून, आता सर्जा राजाच्या बैलजोडीच्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करून शेतकऱ्यांची धुळवाफ भात पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
पन्हाळा तालुका कासारी नदीला बारमाही पाणी उपलब्ध असल्याने या परिसरात शेतकरी प्रामुख्याने ऊस शेतीच करतात. तसेच अंतर पीक म्हणून भात,सूर्यफूल, मका,भुईमूग,सोयाबीन व भाजीपाल्याचे पीक घेतात.सूर्यफूल क्षेत्रात वाढ झाली आहे. सूर्यफूल, भुईमूग,व मका पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. यंदा या परिसरात वळीव पाऊस जास्त प्रमाणात झाला नाही.ऊस भरणीची काम अंतिम टप्प्यात असून मे च्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या वळीवाने ऊस जोमदार आहे.आडसाली ऊस लागणीसाठी सरी सोडायची धांदल सुरू आहे. मशागत करून शेतकरी कुरीच्या साह्याने धुळवाफ पेरण्या करत आहेत. शेतकऱ्यांची पारंपरिक बियाणे ऐवजी संकरीत वाणाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या विविध जातीच्या भात बियाण्यांकडे ओढ आहे.बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्राकडे धावपळ करावी लागते.
रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, पेरणीची सुरवात केली असून, पाण्याची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागणी करण्याकडे कल दिसत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या वर्षभरातील अर्थसंकल्प अवलंबून असणारा खरीप हंगामाची सुरूवात रोहिणी नक्षत्रातून होत असते. ती घात साधून आपले अर्थचक्र गतीमान करणेसाठी शेतकरी वर्ग उत्सुक असल्याचे आशादायी चित्र आहे.वळवाच्या पावसाने ओढ दिली आहे.मात्र शेतीतील खरिप हंगामाच्या अगोदर कराव्या लागणाऱ्या अंतर मशागतीसाठी जोर धरला आहे. मशागतीसाठी बैलांचा वापर कमी झाला असून ट्रॅक्टर व पावर टिलरचा वापर वाढला आहे. जेथे पाण्याची सोय आहे.अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी भात पेरणी करून पाणी दिले आहे.शाळेला सुट्या असल्याने शिवार माणसांनी फुलली आहेत.काही दिवसांत धुळवाफ भात पेरणी पूर्ण होईल अशी शक्यता आहे.