अंतिम पांगलला सुवर्णपदक
वृत्तसंस्था / अहमदाबाद
येथे सुरू असलेल्या 2025 सालातील वरिष्ठांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताची महिला मल्ल तसेच दोनवेळा विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक विजेती अंतिम पांगलने 55 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले.
या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रेल्वे संघाचे प्रतिनिधीत्व करताना अंतिम पांगलने हे यश मिळविले. महिलांची ही स्पर्धा 10 विविध वजन गटामध्ये घेतली गेली. 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पूर्व तयारी म्हणून ही स्पर्धा खेळविली जात आहे.अंतिम पांगलला या स्पर्धेत 53 ऐवज 55 किलो गटात स्थान देण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मनीषाने 57 किलो गटात, निशा दाहीयाने 68 किलो गटात सुवर्णपदके मिळविली. मात्र 76 किलो वजन गटात हरियाणाच्या ज्योती बेरवालने सुवर्णपदक पटकाविले. या गटात प्रिया मलिकला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 62 किलो वजन गटात मानसीने कांस्यपदक घेतले. राजस्थानच्या अंजलीने 53 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले. हरियाणाच्या रनजीताने 59 किलो गटात सुवर्णपदक मिळविले. 65 किलो गटात हरियाणाच्या पुलकीतने तसेच 72 किलो वजन गटात सेनादलाच्या दीक्षाने सुवर्णपदके घेतली. या स्पर्धेमध्ये हरियाणाने सर्वोंकश विजेतेपद मिळविताना 190 गुण नोंदविले. रेल्वे संघाने 144 गुणांसह दुसरे स्थान तर दिल्लीने 112 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेत आता पुरूषांच्या फ्रीस्टाईल प्रकाराला रविवारपासून प्रारंभ होत आहे. भारताचा पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता मल्ल अमन 61 किलो वजन गटात भाग घेत आहे.