आयपीएलच्या समालोचकांचे पॅनेल जाहीर
सुनील गावसकर,रवी शास्त्री, ब्रायन लारा, हरभजन सिंग यांच्यासह अनेक दिग्गज घेणार हातात माईक
वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. याआधी आयपीएलचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने आगामी हंगामासाठी हिंदी आणि इंग्रजी टीव्ही समालोचक पॅनलची घोषणा केली. सुनील गावसकर, रवी शास्त्री, हरभजन सिंग अशा अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. 22 मार्चपासून पहिल्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात होणार असून यादरम्यान कॉमेंट्री पॅनलही जाहीर करण्यात आले आहे. यात इंग्रजी आणि हिंदी कॉमेंट्रीची जबाबदारी वेगवेगळ्या दिग्गजांवर सोपवण्यात आली आहे. हिंदी कॉमेंट्री पॅनेलमध्ये सुनील गावसकर, रवी शास्त्राr, हरभजन सिंग, इरफान पठाण, इम्रान ताहिर, अंबाती रायडू, वरुण आरोन, मिताली राज, मोहम्मद कैफ, संजय मांजरेकर, वसीम जाफर, गुरकीरत मान, उन्मुक्त चंद, जतिन सप्रू, दीप दासगुप्त, रजत भाटिया, विवेक राजदान आणि रमन पद्मजीत यांचा समावेश आहे. मिताली राज ही एकमेव महिला क्रिकेटपटू आहे, जिचा समावेश हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये आहे.
इंग्रजी पॅनेलमध्ये अनेक दिग्गज
स्टार स्पोर्ट्सच्या इंग्रजी पॅनेलमध्ये सुनील गावसकर, ब्रायन लारा, रवी शास्त्राr, हर्षा भोगले, स्टीव्ह स्मिथ, स्टुअर्ट ब्रॉड, डेल स्टेन, जॅक कॅलिस, टॉम मूडी, पॉल कॉलिंगवूड, मॅथ्यू हेडन, केविन पीटरसन, मायकेल क्लार्क, संजय मांजरेकर, अॅरॉन फिंच, डॅरेन गंगा, इयान बिशप, नाइट, कॅटिच, मॉरिसन, बद्री, केटी, ग्रॅम स्वान, दीप दासगुप्ता, अंजुम चोप्रा, मुरली कार्तिक, रोहन गावसकर यांचा समावेश असणार आहे.