For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पांडुरंग बोलला, खाप्रेश्वराने ‘दंड’ हाणला!

01:13 PM Mar 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
पांडुरंग बोलला  खाप्रेश्वराने ‘दंड’ हाणला
Advertisement

मडकईकरांच्या आरोपावरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल : देव श्रीखाप्रेश्वर मंदिर स्थलांतरावरुनही संताप कायम

Advertisement

पणजी : माजी मंत्री तथा भाजपचे नेते पांडुरंग मडकईकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारातील एका मंत्र्यावर केलेला लाचखोरीचा आरोप हा गंभीर गुन्हा तर ठरलाच आहे, त्याहीपेक्षा त्यांचे ते वक्तव्य भाजपच्या वर्मी लागले आहे. त्यातून संपूर्ण भाजप आणि सरकारमध्ये हलकल्लोळ माजला आहे. बुधवारी राज्यभरात ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ हाच विषय चर्चिला जात होता. जो तो आपपाल्या परीने ‘तो मंत्री कोण’? याबद्दल आखाडे बांधत होता. त्यामुळे सरकारबद्दल एकप्रकारे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुसऱ्या बाजूने मडकईकर यांच्या तोंडी आलेल्या या वक्तव्याने सरकारला जेरीस आणले असले तरी तेच वक्तव्य विरोधकांच्या मात्र चांगलेच पथ्यावर पडले आहे. त्यातूनच संपूर्ण दिवसभरात विरोधक सरकारवर अक्षरश: तुटून पडले. अनेकांनी याचा संबंध थेट पर्वरीतील देव श्रीखाप्रेश्वराशी लावताना, ‘पांडुरंगाच्या तोंडी देव बोलला व 24 तास उलटण्याच्या आधीच सरकारच्या माथी दंड हाणला’, असे दावेही केले. त्याहीपुढे जाताना काही राजकीय विरोधकांनी, ‘आता देव श्रीखाप्रेश्वराचा कोपच या सरकारला लयास नेईल’, अशी भविष्यवाणीही केली आहे.

Advertisement

 बी. एल. संतोष यांचे येणे अन् असंतोष

योगायोग म्हणजे, देव खाप्रेश्वराचे स्थलांतर आणि मडकईकरांचा गंभीर आरोप या दोन्ही घटना भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल संतोष हे गोवा भेटीवर आलेले असतानाच घडल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकणे क्रमप्राप्तच होते. त्याशिवाय पत्रकारही मिळेल तेथे मिळेल त्या मंत्री, आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांना गाठून दोन्ही घटनांसंबंधी प्रश्नांच्या फैरी झाडत होते. त्यांचे समाधान करताना प्रत्येकाची गोची होत होती.

तो मंत्री कोण, हे मडकईकरांनाच विचारा : मुख्यमंत्री

पत्रकारांच्या प्रश्नांच्या फैरींतून खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही सुटले नाहीत.  एका ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, ‘तो’ मंत्री कोण ते तुम्ही मडकईकर यांनाच विचारा’, एवढेच अल्प उत्तर देत काढता पाय घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मात्र याप्रश्नी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मडकईकर यांच्या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांची बोलतीच बंद केली आहे, अशी टिपणी विरोधकांकडून करण्यात आली.

दोघांच्याही विरोधात गुन्हा नोंदवा : पालेकर

बुधवारी दिवसभरात अनेक राजकीय विरोधकांनी पत्रकार परिषदता, पत्रके, आदींच्या माध्यमातून सरकारवर टीका, आरोपांच्या फैरी झाडल्या. आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमित पालेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, लाच देणे आणि घेणे हे दोन्ही गंभीर गुन्हे असल्याने पोलिसांनी दोघांच्याही विरोधात गुन्हा नोंदवून चौकशी करावी, तसेच मडकईकर यांनी त्या मंत्र्याचे नाव उघड करावे, अशी मागणी केली.

मडकईकरांनी मंत्र्याचे नाव जाहीर करावे : गुदिन्हो

मडकईकरांनी केलेल्या आरोपाविषयी पत्रकारांशी बोलताना, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी, माजी मंत्री मडकईकर यांनीच त्या लाचखोर मंत्र्याचे नाव जाहीर करावे आणि त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करावी, असे आवाहन केले आहे.

भ्रष्टाचारावर मडकईकरांकडून शिक्कामोर्तब : चोडणकर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर यांनी जारी केलेल्या पत्रकात माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या धक्कादायक वक्तव्यातून ‘सर्व मंत्री पैसे कमावण्यात व्यस्त असून पैशांशिवाय सरकारचे पानही हलत नाही’ हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका केली आहे. मडकईकर यांनी या भ्रष्टाचाराला ‘लूट’ म्हणून शिक्कामोर्तब केल्याचेही चोडणकर यांनी म्हटले आहे.

आता ‘हिंदू खतरे मे’ नाही का? : घाटे

सेवादलचे राज्य प्रमुख राजन घाटे यांनी प्रतिक्रिया देताना, भाजपकडून वारंवार उल्लेख होत असलेल्या ‘हिंदू खतरे मे है’ या वक्तव्यावर बोट ठेवले. याच भाजपकडून जेव्हा लोकभावनेची कोणतीही कदर न करता मंदिरे, धार्मिक स्थळे, श्रद्धास्थाने तोडण्यात, स्थलांतरीत करण्यात येतात तेव्हा ‘हिंदू खतरे मे’ येत नाही का? असा सवाल उपस्थित केला. अशाप्रकारे शिमेचा राखणदार असलेल्या खाप्रेश्वराचे मंदिर त्याची विटंबणा करून हटविताना, स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे आरएसएस, बजरंग दल, सनातन या संस्थांचे कार्यकर्ते कुठे गायब झाले आहेत? आज जर राज्यात काँग्रेसचे सरकार असते तर याच लोकांनी राज्यभरात अक्षरश: आकांडतांडव केले असते. खरे तर भाजपच्या राजवटीत आज हिंदू धर्म खतरेमे है, असा आरोप घाटे यांनी केला.

मंदिर हटविणे ही चुकच : ट्रोजन डिमेलो

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनीही पर्वरीतील देव खाप्रेश्वराचे मंदिर हटविण्यास विरोध केला आहे. तेथील वटवृक्ष हटविणे आणि मंदिर हटविणे हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. अशावेळी जेव्हा रस्त्याच्या बांधकामात अडथळा ठरत असल्याने तेथील वटवृक्ष हटविणे क्रमप्राप्त ठरले असले आणि त्यासाठी संबंधितांनी मंजुरी दिलीही असली तरी ती देताना त्यांनी मंदिर न हटविण्याबद्दल ठाम राहायला हवे होते, असे डिमेलो यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.