Vari Pandharichi 2025: आषाढी एकादशी
Vari Pandharichi 2025:
आषाढी एकादशीचा दिवस हा वारीचा मुख्य दिवस असतो. या दिवशी भल्या पहाटेपासून चंद्रभागा स्नानास गर्दी होते. किंबहुना दशमीच्या रात्री आणि एकादशीस दिवसभर चंद्रभागा स्नान चालूच असते. आषाढी एकादशीला पहाटे विठ्ठल मंदिरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात येते. ही महापूजा शासनाच्या वतीने आणि शासनाच्या खर्चाने केली जाते. त्यामुळे याला शासकीय महापूजा असे म्हणतात. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी त्या त्या संतांच्या पादुकांची पूजा करण्यात येते.
नगरप्रदक्षिणेसाठी निघतात. नगरप्रदक्षिणा म्हणजे पंढरपूर नगराला प्रदक्षिणा. अर्थात आताच्या विस्तारित पूर्ण पंढरपूरला प्रदक्षिणा करणे अपेक्षित नसून जुन्या पंढरपूरला प्रदक्षिणा करणे.
या प्रदक्षिणा मार्गावर काही ठिकाणी पूर्वी जुन्या गावाच्या खुणा असलेल्या वेशी होत्या, जसे की महाद्वार वेस. पण पुढे गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने केलेल्या पंढरपूरच्या नगरविकास आराखड्यामध्ये या वेशी काढून टाकण्यात आल्या आहेत. नगर प्रदक्षिणा मार्ग महाद्वार घाटावरून कालिका मंदिर चौक, तेथून वळून काळा मारुती चौक, तेथून पुन्हा वळून गोपाळकृष्ण मंदिरापासून नाथ चौक, तेथून पुन्हा वळून तांबड्या मारुतीपासून पुन्हा महाद्वार घाट असा आहे. या मार्गावर कोठूनही प्रदक्षिणेस सुरुवात करून पुन्हा त्या ठिकाणी आले म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण होते.